बीड/प्रतिनिधी
नांदेड जिल्ह्यातील एका तरूणीला येळंबघाट परिसरात अॅसिड व पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रकार काल पहाटे घडला आहे. हा प्रकार अतिशय दुर्दैवी असून एखाद्याला जिवंत जाळणं हे वेदनादायी आहे, या घटनेने मन सुन्न झाले. या प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करून कारवाई करावी तसेच स्पेशल टास्कफोर्स नेमुन चौकशी करण्यात यावी अशी मागणी आ.संदिप क्षीरसागर यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, बीडचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे, बीडचे पोलीस अधिक्षक आर.राजास्वामी यांच्याकडे केली आहे.
बीड तालुक्यातील येळंबघाट येथे शनिवारी रस्त्यालगत 22 वर्षीय तरूणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आली. शेळगाव (ता.देगलूर जि.नांदेड) येथील तरूणी त्याच गावातील एका तरूणासोबत पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दि.13 नोव्हेंबर रोजी रात्री दोघेही पुण्याहून गावी परतत असतांना दुचाकीवरून जात असतांना येळंघाट जवळ तिच्या अंगावर अॅसिड व पेट्रोल टाकून जाळल्यानंतर तिला उपचारार्थ बीडच्या जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारा दरम्यान सदरील तरूणीचा मृत्यू झाला असून या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेतील आरोपींना तातडीने अटक करून सदरील प्रकरणाची स्पेशल टास्कफोर्स नेमुन चौकशी करून आरोपीला कठोर कारवाई करावी अशी मागणी आ.संदिप क्षीरसागर यांनी पत्राद्वारे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, बीडचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे, बीडचे पोलीस अधिक्षक आर.राजास्वामी यांच्याकडे केली आहे.