पुणे, 7 ऑगस्ट : पुण्यातील (Pune) दंतवैद्य डॉ. अर्चना गोगटे यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या कार्यालयाने सुखद धक्का दिला आहे. स्थानिक पालिका आणि पोलीस प्रशासनाकडे तक्रार करून त्या थकल्या आणि वैतागून त्यांनी थेट PMO पोर्टलवर तक्रार केली. यालाही बराच वेळ लोटला, मात्र अचानक पंतप्रधान कार्यालयाचा उत्पादन शुल्क विभागाला फोन आला आणि यंत्रणा हालली. त्यामुळे गोगटे यांचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
पुण्यातील प्रसिद्ध फर्ग्युसन रस्त्यावर ज्ञानेश्वर पादुका चौकात समोरून चकाचक, पॉश दिसणाऱ्या इमारतीत पहिल्या मजल्यावर डॉ. अर्चना यांचं डेंटल क्लीनिक आहे. मात्र इमारतीत खाली असलेल्या वाईन शॉपमुळे मद्यपींची गर्दी, त्यांनी फेकलेल्या दारूच्या बाटल्या आणि कचरा यामुळं सगळा परिसर गलिच्छ व्हायचा आणि याचा त्रास रुग्णांना सहन करावा लागत. साहजिकच याचा फटका डॉ. अर्चना यांना बसला.
अर्चना गोगटे यांनी याची तक्रार पालिका ,पोलीस ,सोसायटी यांच्याकडे केली. मात्र कुणी दखल घेईना. शेवटी त्यांनी क्लीनिकची जागा बदलली आणि या ठिकाणी फक्त लॅब ठेवली. मात्र त्याआधी त्यांनी अखेरचा उपाय म्हणून वैतागून PMO पोर्टलवर तक्रार केली. त्यालाही दीड वर्ष लोटलं. पण अचानक 4 ऑगस्टला त्यांना उत्पादन शुल्क विभागातून फोन आला आणि अचानक सूत्र हालली.
सुरुवातीला डॉ. अर्चना यांना विश्वासच बसेना. मात्र त्या ताडीवाला रस्त्यावरील उत्पादन शुल्क विभागात गेल्या आणि तिथल्या अधिकाऱ्यांनी त्यांची तक्रार परत ऐकून घेतली. अजगरासारखी सुस्त यंत्रणा हालली होती.
दुसरीकडे वाईन शॉप मालकाने अर्ध्या दिवसात सगळा परिसर चकाचक केला. तसंच अस्वच्छता आणि दारू पिणाऱ्या लोकांचा त्रास होणार नाही याची हमी दिली. एरवी आपण बरं आणि आपलं काम बरं आणि व्यवस्थेला शिव्या घालून सामान्य माणूस स्वस्थ बसतो. पण या घटनेने डॉ. अर्चना यांना जो आत्मविश्वास दिला आहे त्यामुळे त्यांना प्रचंड बळ आलं आहे.