आज दुपारी बारामती नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदान (बोनस) मिळवण्यासाठी थेट नगरपालिकेच्या इमारतीवर चढून काळे झेंडे दाखवले होते. दिवाळीनिमित्त नगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी बोनस मिळावा, अशी मागणी केली. या मागणीसाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी कालपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीत पहिल्यांदाच नगर पालिकेवर काळे झेंड फडणण्याची घटना घडली होती. अजित पवार यांनी या प्रकरणाची दखल घेऊन तातडीने कर्मचाऱ्यांना बैठकीला बोलावले आहे.
बारामतीत नगरपरिषदेच्या इमारतीवर कर्मचाऱ्यांनी सानुग्रह अनुदान मिळणेबाबत काळे झेंडे फडकवून निषेध केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तातडीने अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. आज संध्याकाळी ही बैठक होणार आहे. या बैठकीत कर्मचाऱ्यांना सानुग्रह अनुदानावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन दिवसांपासून हे कर्मचारी आंदोलन करत आहे. पण, त्यांच्या आंदोलनाची कुणीही दखल घेतली नाही. नगराध्यक्षा किंवा नगरसेवकांपैकी कोणीही भेटायला आलं नाही. त्यामुळे नगरपालिका कर्मचारी आणखी संतप्त झाले. त्यामुळे आज थेट नगरपालिकेच्या इमारतीवर चढून काळे झेंडे फडकवून आंदोलन केलं आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली.
विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही या कर्मचारी संघटनेकडून निवेदन देण्यात आल आहे. मात्र, अद्याप त्यावर कोणताही निर्णय न झाल्यानं दुसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरूच ठेवले होते.