औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील चौका ते लाडसावंगी रस्त्यावर असलेल्या राधा गोविंद सेवा मिशन आश्रमातील प्रियशरण ऊर्फ यादवचंद्र राधाकृष्ण पाराशर महाराजांवर (वय-61) अज्ञात सात ते आठ लोकांनी मारहाण करता त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. ही घटना बुधवारी रात्री घडली असून फुलंब्री पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारहाणीचे कारण अद्यापही अस्पष्ट असून रात्री आश्रमाच्या दरवाज्याची कडी कोयंडा तोडत अज्ञात हल्लेखोरांना आश्रमात प्रवेश केला. प्रियशरण महाराजांच्या डाव्या खांद्यावर चाकूने वार करत मारहाण केली. यासोबतच जीवे मारण्याची धमकीही दिली.
हल्लेखोरांनी आश्रमातील कुठल्याही वस्तूला हात लावला नाही. तसेच कुठल्याही प्रकारची चोरी केली नाही. यामुळे सुडीच्या उद्देशाने हल्ला केल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
मिळालेली माहिती अशी की, प्रियशरण महाराज व त्यांचे साधक रात्री झोपलेले असताना बुधवारी पहाटे दोन ते अडीच वाजेच्या दरम्यान अज्ञात सात ते आठ हल्लेखोरांनी त्यांच्या सेवा आश्रमाच्या दरवाजाची कडी तोडून आत प्रवेश केला. काही न बोलता महाराज व त्यांच्या साधकांना जबर मारहाण करून जखमी केले व शिवीगाळ करत जिवे मारण्याच्या धमक्या देत घटनास्थळावरून पळ काढला. त्यानंतर सदर घटनेची माहिती फुलंब्री पोलिसांना देण्यात आली. पोलिस निरीक्षक अशोक मुदीराज, पोलिस उपनिरीक्षक दामोदर वाघमारे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली त्यानंतर बुधवारी सकाळी श्वान पथक व स्थानिक गुन्हेे शाखेच्या पथकालाही पाचारण करण्यात आले. परंतु कुठलाही माग निघाला नाही. हल्लेखोरांनी आश्रमात घुसून महाराज व त्यांच्या साधकांना गंभीर मारहाण करून जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या. याप्रकरणी फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून जखमी महाराजांवर औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
चौका परिसरातील साताळा शिवारात राधे गोविंद सेवा मिशन या नावाने आश्रम आहे. राधा गोविंद सेवा आश्रमात मोठ्या संख्येने भक्त गण येतात. प्रियशरण महाराजांना जखमी अवस्थेत औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी घेतलेल्या जबाबाच्या आधारे प्रियशरण महाराजांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.