पोलिसांनी हिंमत दाखवावी अन् मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर गुन्हा नोंदवावा

जळगावात वाहक म्हणून कार्यरत असलेले एसटी मनोज चौधरी यांच्या आत्महत्येनंतर विरोधकांनी ठाकरे सरकारविरोधात टीकास्त्र सोडलं आहे. आत्महत्या करण्यापूर्वी मनोजने चिठ्ठी लिहिली असून त्यात मराठी माणसांचे ठाकरे सरकार हेच माझ्या आत्महत्येला जबाबदार असल्याचा उल्लेख केला आहे. कमी पगार आणि अनियमितेला कंटाळून एसटी कर्मचाऱ्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.

यावरून माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवर म्हटलंय की, पोलिसांनी हिंमत दाखवावी आणि उद्धव ठाकरेवर कलम ३०६ अंतर्गत गुन्हा नोंदवावा. एसटी कामगार तडफडत आपला जीव देत आहे, या सरकारला त्यांच्या जीवाची काय पडलेली नाही. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी सगळ्या एसटी गाड्या मंत्रालयाच्या आवारात उभ्या कराव्यात मग बघा प्रश्न सुटतो की नाही असं आवाहन त्यांनी केलं आहे.

तर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी अर्णब गोस्वामीची अटक होऊ शकते तर एसटीचे वाहक मनोज चौधरी यांच्या आत्महत्या प्रकरणी बेशरम ठाकरे सरकारमधील परिवहनमंत्री अनिल परबना का अटक करत नाही? मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनाही जबाबदार धरावे असा टोला भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

दरम्यान, भाजपा नेते गिरीश महाजन यांनीही ठाकरे सरकारवर टीका केली आहे. मनोज चौधरी हे गेल्या १० वर्षांपासून ते कार्यरत होते, राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे आक्रोश आंदोलन सुरू आहे. कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय रस्त्यावर उतरले आहेत, त्यामुळे माझ्यावर आत्महत्या करण्याची वेळ आल्याचं मनोज यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे.

सरकार गेंड्याच्या कातडीचं असून कुठल्याच संवेदना या सरकारला नाहीत. एकीकडे दिवाळीचा सण तोंडावर आला असताना, 4-4 महिने तुम्ही लोकांना पगार देत नाहीत. शेतकऱ्यांना सांगितलं की दिवाळी गोड करू, त्यांनाही कुणी एक रुपया द्यायला तयार नाही अशा शब्दात माजी मंत्री गिरीश महाजन यांनी निशाणा साधला आहे.

काय आहे घटना?

मनोज परिवारासह कुसुंबा येथे वास्तव्याला होता. सोमवारी सकाळी साडे आठ वाजले तरी वरच्या मजल्यावरुन खाली आला नाही म्हणून भाऊ त्याला उठवायला गेला असता त्याने हॉलमध्ये गळफास घेतल्याचे दिसले. शेजारीच त्याने एका वहीच्या पानावर सात आठ ओळींची चिठ्ठी आढळून आली. भाऊ व मित्रांनी त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात आणले, मात्र तेथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. यावेळी भाऊ, पत्नी व इतर नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

error: Content is protected !!