विद्यार्थिनीने छेडछाडीला विरोध केल्याने तिला जिवंत जाळले

बलिया शेजारच्या देवरिया जिल्ह्यात मुलीच्या छेडछाडीची तक्रार करणाऱ्य़ा मुलीच्या वडिलांना मारहाण करत त्यांची हत्या करण्यात आली होती. ही घटना ताजी असतानाच आता बलियामध्येही मुलीला जिवंत जाळण्यात आले. या घटनांमुळे उत्तर प्रदेशमध्ये महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील नगवा गावात छेडछाडीला विरोध करणाऱ्य़ा एका विद्यार्थिनीला गावातील तरुणाने तिच्या घरात घुसून जाळून टाकले. मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करीत असलेले मुलीचे वडिलही यात गंभीर जखमी झाले आहेत. जळालेल्या या विद्यार्थिनीला वाराणसीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती गंभीर आहे.

बलिया जिल्ह्यात नगवा गावातील तरुण विद्यार्थीनीची छेडकाढीत तिला माझ्या मनासारखे वाग अशी बळजबरी करीत होता. शनिवारी ती शिकवणीसाठी जात असताना त्याने तिला छेडले. तेव्हा तिने त्याला विरोध केला व ती घरी पळून आली. मात्र तोही तिच्या मागे आला आणि तिच्या घरात शिरुन त्याने तिच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जाळले. मुलीचे ओरडणे ऐकून तिचे वडील तिला वाचवण्यासाठी आले. मुलीला वाचवताना तेही भाजले.

आगीत होरपळलेल्या या विद्यार्थीनीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर वाराणसी येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान पोलिसांनी गावात येऊन तरुणाला अटक केली आहे.

error: Content is protected !!