पाटणा : मतदानानंतर आलेल्या एक्झिटपोलमध्ये मुख्यमंत्री नितीश कुमार यांना टाटा-बाय-बाय होणार आणि राष्ट्रीय जनता दलाच्या (आरजेडी) नेतृत्वाखालील सरकार येणार, असे संकेत मिळत आहेत. मात्र, या एक्झिट पोलच्या निकालामुळे आनंदात असूनही काँग्रेसची झोप उडाली असल्याचे दिसत आहे. त्यांना आता आमदार फुटण्याची भीती वाटू लागली आहे. बिहारमध्ये 243 विधानसभा जागांसाठी मतदान प्रक्रियी पार पडली. उद्या म्हणजेच 10 नोव्हेंबरला निवडणूक निकाल येणार आहेत.
एक्झिटपोलनंतर सक्रीय झालेल्या काँग्रेसने मतमोजणीनंतर आमदारांना एकत्रित ठेवण्यासाठी दोन वरिष्ठ नेत्यांना पाटना येथे पाठवले आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पक्षाचे महासचिव अविनाश पांडेय आणि रणदीप सिंह सुरजेवाला यांना पाटणा येथे पाठवून, निवडणूक निकालानंतरच्या परिस्थितीचे व्यवस करण्याची जबाबदारी दिली आहे.
एक्झिट पोलनुसार, बिहार निवडणुकीत काट्याची टक्कर होण्याची शक्यता आहे. अशात घोडेबाजारही होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे या दोन्ही नेत्यांना पाटणा येथे पाठवण्यात आले आहे. हे दोन्ही नेते बिहारमध्ये राहतील. तसेच आघाडीतील सहकाऱ्यांसोबत समन्वय ठेवण्याचे काम करतील. महा आघाडीमध्ये आरजेडीसोबत काँग्रेस आणि डावा पक्षही सहभागी आहे. तर एनडीएमध्ये जेडीयू, भारतीय जनता पक्ष (भाजप), जीतनराम मांझींचा पक्ष, मुकेश सहनी यांचा (व्हीआयपी) देखील सहभागी आहे. ही लढाई काट्याची झाली आणि आणि एनडीए बहुमतासाठी आवश्यक असलेल्या 122 या जादूई आकड्याच्या जवळपास पोहोचला तर घोडेबाजार होऊ शकतो. यामुळे कमी जागां जिंकणारा पक्ष अधिक दुर्बल होईल.
यामुळे काँग्रेस आधीच सतर्क झाली आहे. तसेच काँग्रेसने आपल्या सर्व उमेदवारांना, विजयानंतर विजयी मिरवणुका न काढता प्रमाणपत्र घेऊन सरळ पाटण्याला यावे, असे सांगितले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या सर्व आमदारांना पाटण्याच्या एखाद्या हॉटेलमध्ये ठेवण्याची काँग्रेसची योजना आहे. आलेल्या एक्झिटपोलनुसार, निकाल आले, तर राज्यात महा आघाडी सरकार येणे निश्चित आहे.