पाटणा : बिहारच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेत जर कोणी असेल तर ते आहेत तेजस्वी यादव. क्रिकेटपटू ते बिहारचे उपमुख्यमंत्री असा प्रवास केलेला हा युवानेता आज (9 नोव्हेंबर) आपला 31 वा वाढदिवस साजरा करत आहे. बिहार निवडणुकीच्या बहुतांश एक्झिट पोलमध्ये महागठबंधनचे सरकार सत्ते येऊन, राजदचे नेते आणि महागठबंधनचे उमेदवार तेजस्वी यादव बिहारचे नवे मुख्यमंत्री बनू शकतील असा अंदाज वर्तवला जात आहे. एक्झिट पोलचा अंदाज खरा ठरला तर तेजस्वी यादव बिहारमध्येच नाही तर संपूर्ण देशात इतिहास रचू शकतात. तेजस्वी यादव बिहारचे मुख्यमंत्री बनले तर ते राज्याचे सर्वात तरुण मुख्यमंत्री ठरतील.
राजकारण येऊ आणि एवढ्या लवकर विक्रम बनवण्याच्या जवळ पोहोचतील याचा विचार तेजस्वी यादव यांनी कधीच केला नव्हता. पण काळाचं चक्र असं काही फिरलं की क्रिकेटच्या मैदानात चौकार-षटकार लगावणाऱ्या तेजस्वी यादव यांना बॅट आणि बॉल दूर सारुन राजकारणाच्या पीचवर नव्या इनिंगसाठी तयार व्हावं लागलं. यादरम्यान त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. परिस्थिती अशीही आली की जम बसण्याआधी त्यांची इनिंग संपतेय की काय अशी शंका आली. पण यंदाच्या निवडणुकीत तेजस्वी विरोधकांवर भारी पडत असल्याचं दिसत आहेत.
क्रिकेटमध्ये ‘फ्लॉप’ पण राजकारणात ‘हिट’
फलंदाजी किंवा गोलंदाजीमध्ये अपेक्षित कामगिरी करु न शकल्याने तेजस्वी यादव यांचं क्रिकेटपटू बनण्याचं स्वप्न अधुरं राहिलं. आपल्या छोट्याशा क्रिकेट कारकीर्दीत तेजस्वी यादव एकमेव प्रथम श्रेणी सामना, दोन ‘ए’ श्रेणी आणि चार ट्वण्टी-20 सामन्यात खेळले आहेत. फलंदाजीमध्ये त्यांच्या सर्वाधिक धावा 19 होत्या. तर गोलंदाजीमध्ये त्यांनी 10 षटकात केवळ एकच विकेट घेतली होती. परंतु आपल्या दोन वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत तेजस्वी आतापर्यंत हिट ठरले आहेत. हेच कारण आहे की विरोधकांवर त्यांच्या टीकेचे बाण निशाण्यावर लागतात. तरुण त्यांना युथ आयकॉनच म्हणतात.
विसाव्या वर्षी क्रिकेटपटू सव्वीसाव्या वर्षी उपमुख्यमंत्री
तेजस्वी यादव यांनी एकेकाळी क्रिकेटची करिअर म्हणून निवड केली होती. यामध्ये त्यांना कुटुंबीयांचंही पाठबळ मिळालं होतं. त्यावेळी लालू प्रसाद यादव हे क्रिकेटशी संबंधित होते. तेजस्वी यादव 20 वर्षांचे असताना म्हणजेच 2009 मध्ये त्यांनी आपल्या क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात केली होती. त्या वर्षी तेजस्वी यादव यांचा झारखंडच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये समावेश झाला होता. तेजस्वी यादव यांनी क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली खरी पण त्यांना म्हणावी कामगिरी तशी झाली नाही. तेजस्वी यांनी रणजीसह आयपीएलकडेही वळले. आयपीएलच्या अनेक मोसमात त्यांचा दिल्ली डेअरडेव्हिल्स संघात समावेश करण्यात आला होता. परंतु त्यांना एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नाही. तेजस्वी संघात एक अष्टपैलू होते.