रात्र रात्र जागून सिजनच्या सिजन संपवून टाकणाऱ्यांची कमी नाही. काही काम न करता रात्रभर फक्त सिरीज बघत बसतात, असे टोमणे आई वडील नातेवाईक सगळीकडून त्यांच्यावर पडत असतात. पण एका मुलाने वेब सिरीज बघताना तब्बल 75 लोकांचे जीव वाचवले आहेत. तुम्ही म्हणाल काय चेष्टा करता? वेब सिरीज बघताना जीव वाचवणे कसे शक्य आहे? सध्या तरुणांचे कॉलेज बंद असल्याने बराच वेळ त्यांना मिळत आहे. या काळात वेबसिरीज बघण्याची हौस सगळे फेडून घेत आहेत.
तर गोष्ट डोंबवलीच्या कोपर भागातली. जुनी झालेली एक दुमजली बिल्डिंग नुकतीच जमिनदोस्त झाली. पण कुठलीही जीवितहानी झाली नाही. कारण एका तरुणाला बिल्डिंग हळूहळू ढासळत आहे हे समजून गेले. हा तरुण वेबसिरीज पाहण्यासाठी सकाळी ४ वाजेपर्यंत जागा होता. बाकी सगळे गाढ झोपी गेल्याने त्यांना काय होत आहे याचा अंदाज नव्हता.
कुणाल असे त्या मुलाचे नाव आहे. कुणालने वेब सिरीज बघत असताना आपल्या घरातील किचनमधील काही भाग ढासळत आहे, हे बघितले आणि लागलीच त्याने घरच्या लोकांना आणि पूर्ण बिल्डिंगला काय होत आहे याची माहिती दिली. लोक भराभर बिल्डिंगच्या बाहेर पडले. काही मिनिटात बिल्डिंग जमीनदोस्त झाली होती. कुणालमुळे मात्र सर्व सुखरूप होते.