चंद्रपूर, 1 नोव्हेंबर : राज्य सरकारमधील काही नेत्यांनी दारूबंदीला विरोध करत ही बंदी उठावी, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या पार्श्वभूमीवर विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर आणि वर्धा या 3 जिल्ह्यांमध्ये दारुमुक्तीच्या लढ्याला व्यापक रुप आलं आहे. येथील स्थानिक आदिवासी नागरिकांनी याविरोधात लढा पुकारला आहे. याचाच भाग म्हणून चंद्रपूरमधील एका 8वीच्या मुलीने दारुबंदीच्या मुद्द्यावर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच पत्र लिहिले आहे. यात तिने ‘माझे बाबा झिंगू घरात यावेत हे आदित्य दादांना रुचेल का?’ असा थेट सवाल मुख्यमंत्र्यांना विचारला आहे. तसेच या जिल्ह्यांमधील दारुबंदी न उठवता आहे ती दारुबंदीच्या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे.
या 8 वीच्या मुलीने आपल्या पत्रात म्हटलं आहे की, “माझे बाबा झिंगून घरात यावेत हे आदित्य दादांना रुचेल का? मद्यपी वाहनचालकाने निरपराध जनतेला चिरडून जावे किंवा माझ्या तेजस दादाच्या गाडीला धडक मारावी या विचारानेही अंग शहारते. आपण सर्व राजमाता जिजाऊ माँ साहेब यांचे वंशज आहोत आणि माँ जगदंबेची ओटी जनतेची कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या करातून आम्ही कशी काय भरणार?”
‘माझे बांधव, माता भगिनी आनंदाने सुखाने नांदोत अशी मागणी आपणच आपले सर्वांचे दैवत पंढरीच्या विठोबांकडे करतो. मग दारुबंदी उठवावी हा आपल्या मंत्री महोदयांचा अनाठायी आग्रह का असावा?’ असा सवालही या आदिवासी मुलीने केला आहे.