उद्धव ठाकरेंनी फेटाळला वाघांच्या नसबंदीचा प्रस्ताव

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील वाघांचा नसबंदीचा प्रस्ताव फेटाळला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नसबंदीचा प्रस्ताव मानद वन्यजीव रक्षकांनी मांडला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत बोलताना हा प्रस्ताव फेटाळून लावला. त्यापेक्षा व्यवस्थापन कसे बळकट करता येईल, त्यादृष्टीने प्रयत्न करा अशी सूचना यावेळी उद्धव ठाकरे यांनी केली.

“वाघ वाढले म्हणून त्यांना इतरत्र स्थानांतरित करायचे, नसबंदी करायची हा वाढत्या व्याघ्रसंख्येमुळे होत असलेल्या मानव-वन्यजीव संघर्षावरील तोडगा नाही. या पर्यायाचा विचार देखील होऊ शकत नाही. त्यापेक्षा व्यवस्थापन कसे बळकट करता येईल, त्यादृष्टीने प्रयत्न करा,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

राज्य वन्यजीव मंडळाची मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेतील ही पहिलीच बैठक होती. गेल्या काही दिवसात त्यांनी जंगल, वन्यजीव, पर्यावरणाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. “आपण सातत्त्याने माणसांचाच विचार करत आलो आहोत आणि त्यामुळे करोनासारखे दिवस आपल्याला दिसत आहेत. आता मात्र वने, वन्यजीव आणि पर्यावरणाचे महत्त्व समजून घ्यावे लागेल. याबाबत ज्या काही अडचणी असतील, त्या सोडवण्यासाठी मी कटीबद्ध आहे,” असं आश्वाासन राज्य वन्यजीव मंडळाचे अध्यक्ष व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं.

मेळघाटमधून जाणारी पूर्णा-खंडवा रेल्वेबाबत त्यांनी स्पष्ट सांगितलं की, “गाभा क्षेत्रातून ही रेल्वे नेण्याला काही अर्थ नाही. गाभा क्षेत्रातून वन्यप्राणी संरक्षण झाले पाहिजे. त्याठिकाणी गावांचे पूनर्वसन झाले आहे आणि रेल्वे ही लोकांसाठी आहे. अधिकाधिक गावांना ती कशी जोडता येईल याकरिता आहे. म्हणूनच याबाबत तेथील सर्व आमदार व खासदारांशी चर्चा केली आहे. ती रेल्वे बाहेरुन जावी या मताचा मी असून त्याबाबत केंद्राला पत्रही लिहिलं आहे”. यावर सदस्यांनी देखील हा रेल्वे प्रकल्प बाहेरुन नेण्याच्या मताचे आम्ही आहोत असं सांगत मुख्यमंत्र्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!