नवी दिल्ली 7 ऑगस्ट: गेल्या काही महिन्यांपासून बंद पडलेल्या शाळा आता पुन्हा सुरु होण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार त्यावर गांभिर्याने विचार करत आहे. 1 सप्टेंबरपासून टप्प्या टप्प्याने या शाळा सुरु होणार आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी एका बैठकीत या प्रस्तावावर विचार सुरु असल्याचे संकेत दिले. Unlock-3ची मुदत 31 ऑगस्टला संपणार आहे. त्यानंतर नव्या गाईड लाईन्समध्ये यासंबंधी घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Unlockच्या प्रक्रियेनुसार सर्व व्यवहार सुरु करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार सरकारने योजना आणखी आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात शाळा सुरु होऊ शकतात. त्यात 10 ते 12वीच्या वर्गांना परवानगी दिली जाऊ शकते. नंतर क्रमाने विद्यार्थ्यांना बोलावलं जाऊ शकते. त्यासाठी नेमकी काय काळजी घ्यावी याची नियमावली शाळांना दिली जाणार आहे.
मात्र प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक शाळांना सुरु करण्याची परवानगी दिली जाणार नाही असे संकेतही केंद्राने दिली आहेत. मात्र देशात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या 9 दिवसांत जवळपास 50 हजारहून अधिक रोज नवीन कोरोनाग्रस्तांची नोंद केली जात आहे. आज मात्र गेल्या अनेक दिवसांमधील सर्वात धक्कादायक आणि रेकॉर्डब्रेक आकडेवारी समोर आली आहे.
देशभरात 24 तासात 62 हजार 538 नवीन कोरोनाग्रतांची नोंद करण्यात आली असून आतापर्यंतचा आकडा 20 लाख 27 हजार 074 वर पोहोचला आहे. बुधवारी 56 हजार 282 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तर कोरोनामुळे 24 तासांत 904 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाग्रस्त 6 लाख 07 हजार 384 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत देशात 41 हजार 585 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग वेगानं वाढत असला तरीही त्यात दिलासा देणारी बाब म्हणजे आतापर्यंत 13 लाख 78 हजार 105 लोकांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. देशातला रिकव्हरी रेट 67.62% वर पोहोचला आहे. तर चिंतेची बाब म्हणजे महाराष्ट्रातील वाढणारी आकडेवारी कमी होण्याचं नाव घेत नाहीय.