रिपब्लिक’च्या अडचणींत वाढ; मुंबई पोलिसांनी उचलले ‘हे’ मोठे पाऊल

मुंबई:टीआरपी घोटाळा समोर आल्यानंतर संशयाच्या भोवऱ्यात अकडलेल्या ‘ रिपब्लिक टीव्ही ‘च्या अडचणींत वाढ झाली आहे. मुंबई पोलिसांच्या क्राइम ब्रांचने या प्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य वित्त अधिकारी (CFO) शीवा सुब्रमण्यम सुंदरम यांना समन्स बजावले असून उद्या सकाळी ११ वाजता जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींना आज कोर्टात हजर करण्यात आले असता १३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

मुंबई पोलिसांनी गुरुवारी कशाप्रकारे टीआरपी रॅकेट सक्रिय होते, याचा तपशील जाहीर केला होता. टीआरपीशी संबंधित एजन्सीच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून हा घोटाळा करण्यात आला. चॅनेलचे रेटिंग वाढवण्यासाठी पैसे देण्यात आले. मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत माहिती दिली. या घोटाळ्यात फक्त मराठी, बॉक्स सिनेमा आणि रिपब्लिक टीव्हीचा समावेश असल्याचे पुरावे हाती लागले असल्याचेही पोलीस आयुक्तांनी सांगितले. टीआरपी घोटाळ्यात आता मुंबई पोलिसांनी पुढील कारवाई सुरू केली असून याप्रकरणी अटकेतील आरोपींवर भारतीय दंड विधान कलम ४०९ आणि ४२० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगानेच रिपब्लिक टीव्हीचे सीएफओ सुंदरम यांना क्राइम ब्रांचने समन्स बजावले आहे. त्यांना उद्या शनिवारी क्राइम ब्रांचमध्ये हजर राहायचे असून त्यांचा जबाब नोंदवून घेतला जाणार आहे. त्यामुळे रिपब्लिक टीव्हीच्या अडचणींत भर पडली आहे.

आरोपींनी घेतले रिपब्लिक टीव्हीचे नाव

टीआरपी घोटाळा प्रकरणी आतापर्यंत चार जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात टीआरपी मोजण्याचे कंत्राट असलेल्या हंसा रिसर्च ग्रुपच्या दोन माजी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या दोघांनी चौकशीदरम्यान रिपब्लिक टीव्ही, फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या तीन चॅनेल्सची नावे घेतल्याचे सह पोलीस आयुक्त (क्राइम) मिलींद भारंबे यांनी सांगितले. एफआयआर मध्ये इंडिया टुडेचं नाव असलं तरी या चॅनेलविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चौकशीत जी नावे पुढे येतील त्या सर्वांवर कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी व अन्य काही अधिकाऱ्यांचीही चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान, रिपब्लिक टीव्हीचे कन्सल्टिंग एडिटर प्रदीप भंडारी यांनाही पोलिसांनी समन्स बजावले आहे. अभिनेत्री कंगना राणावतच्या घराबाहेर रिपोर्टिंग करत असताना गर्दी जमवल्याप्रकरणी हे समन्स बजावले गेले आहे.

error: Content is protected !!