सोशल डिस्टनसिंग पाळ, आमच्या ४ मंत्र्यांना लागण; मनसे नगरसेवकावर अजित दादा भडकले

पुणेः पिंपरी-चिंचवडमध्ये करोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित दादा पवार यांनी शहरात उभारण्यात येणाऱ्या दोन कोव्हिड सेंटरच्या जागेची पाहणी केली. त्या दरम्यान एक वेगळेच नाट्य घडले. अजित दादाच्या पाहणी दौऱ्यादरम्यान मनसेच्या नागरसेवकाला चांगलेच धारेवर धरलं.

कोव्हिड सेंटरची पाहणी दौऱ्यावेळी त्यांच्याशी बोलायला जाणाऱ्या मनसे नगरसेवक व गटनेते सचिन चिखले यांना लांबून बोल, सोशल डिस्टनसिंग पाळा…. आमचे चार मंत्री करोनाबाधित झाले आहे. अशा कडक शब्दात सुनावले. मात्र, इतकीच काळजी होती तर अधिकारी, कर्मचाऱ्यांना कशाला बोलवायचं, ऐकूनच घ्यायचं नव्हतं तर निमंत्रण दिलेच कशाला, असा सवाल करत सचिन चिखले यांनी अजित पवारांच्या वर्तवणूकीवर नाराजी व्यक्त केली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने महापालिकेतील सर्व पक्षाच्या गट नेत्यांना बोलावलं होतं. पिंपरी चिंचवडमधील प्रशासनाच्या कारभाराची माहिती देण्यासाठी करोना रुग्णांना ऑक्सिजन खाटा उपलब्ध होत नसल्याची माहिती देण्यासाठी सचिन चिखले हे त्या ठिकाणी उपस्थित होते. मात्र, अजित पवारांनी त्याचं काही एक न ऐकता त्यांना दूर होण्यास सांगितलं. या प्रकारावरून मनसे कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. तसंच, पवारांनी एकेरी उल्लेख करत अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रारही चिखले यांनी केली आहे.

घडलेल्या प्रकारावरून राष्ट्रवादी काँग्रेसनं स्पष्टीकरण दिलं आहे. हा प्रकार अजित पवारांच्या नकळत घडला आहे. मास्क लावल्यामुळं नेमकं कोण आहे, हे त्यांच्या लक्षात आलं नाही. मात्र, त्याचा विपर्यास करून गैरसमज करून घेऊ नये अशी विनंती संबधित नगरसेवकास केली आहे. त्याचबरोबर त्यांच्या मागण्या अजित पवारांशी प्रत्यक्ष भेटून ठेवणार आहोत, असं राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!