पुणे । पुणे तिथे काय उणे . या असल्या गोष्टी सुद्धा होऊ लागल्या. लॉकडाउनच्या काळात सायबर गुन्ह्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आधी मैत्री केली आणि नंतर आपल्या जाळ्यात ओढून नग्न अवस्थेत व्हिडिओ कॉल केले. आता या अज्ञात तरुणींनी ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे भेदरलेल्या आठ जणांनी सायबर विभागाकडे धाव घेतली आहे.
हा प्रकार जून आणि ऑगस्ट महिन्यात घडला आहे. 25 ते 40 वयोगटातील शालेय शिक्षक, पगारदार कर्मचाऱ्यांना टार्गेट करण्यात आले आहे. काही तरुणींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या तरुणांशी मैत्री केली आणि नंतर त्यांच्यासोबत न्यूड व्हिडिओ कॉल केले. आता हे व्हिडिओ इतर ठिकाणी अपलोड करण्याची धमकी देऊन पैसे उकळले जात आहे.
या तरुणांची सोशल मीडिया साइटवर तरुणींशी ओळख झाली आणि त्यांनी आपला फोन क्रमांक दिला. त्यानंतर पुढे त्यांच्यासोबत व्हॉट्सअॅपवर चॅट सुरू झाली. काही दिवसांनी व्हिडिओ कॉलही सुरू झाले. व्हॉट्सअॅपवर मैत्री वाढल्यानंतर या तरुणींनी आपले न्यूड व्हिडिओ या तरुणांना शेअर केले. हा प्रकार इथेच थांबला नाहीतर व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल करून तरुणांसोबत न्यूड होऊन गप्पा मारल्या. पण, या तरुणींनी हे सर्व व्हिडिओ कॉल रेकॉर्ड केले होते. त्यानंतर या तरुणांना धमकीचे फोन येण्यास सुरुवात झाली. ‘पैसे द्या नाहीतर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करू’, अशी धमकीच या तरुणांना देण्यात आली.
धमकीचे फोन आल्यामुळे या तरुणांच्या पायाखालची जमीनच सरकली. आपण आता पुरते जाळ्यात अडकलो गेलो आहे. त्यामुळे पैसे देण्या वाचून पर्याय नसल्यामुळे काही जणांनी यूपीआय आणि ऑनलाइनद्वारे पैसेही ट्रान्सफर केले होते.
या आठ जणांपैकी काही जणांनी सायबर पोलिसांकडे तक्रार करण्याआधी दोन तीन वेळा धमकी देणाऱ्यांना पैसे ट्रान्सफर केले होते. 5000 ते 20 हजारांपर्यंत या तरुणांकडून पैशांची मागणी करण्यात आली होती. यातील काही तरुणांनी धमकीचे फोन सतत येत असल्यामुळे पोलिसांमध्ये जाऊन तक्रार दाखल केली. तर काही जणांनी नाहक बदनामी होईल या भीतीने तक्रार दाखल करण्यास टाळले.
ज्या तरुणींनी व्हिडिओ फोन कॉल केले होते, त्यांनी काही विशेष सॉफ्टवेअरचा वापर करून आपले व्हिडिओ रेकॉर्ड केले. त्यानंतर त्यांनी पैसे मागण्यास सुरूवात केली, असं एका तक्रारदार तरुणाने सांगितले.
अशा प्रकारे तरुणांना ओढले जाळ्यात!
या तरुणांना सोशल मीडिया साइटवर हेरण्यात आले होते. त्यानंतर त्यांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवण्यात आली. फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर त्यांच्यासोबत संवाद साधून मैत्री वाढवण्यात आली. त्यानंतर समोरील तरुणाकडून त्याचा फोन क्रमांक मागण्यात आला. जेव्हा या तरुणाने आपला फोन क्रमांक समोरील तरुणीला दिला. त्यानंतर एसएमएस, व्हॉट्सअॅपवर चॅट सुरू झाली. त्यानंतर या तरुणीने व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल केले. यावेळी या तरुणीने समोरील तरुणाला नग्न होण्यास सांगितले. हा सगळा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करण्यात आला आणि त्यानंतर धमकीचे सत्र सुरू झाले.