माॅस्को | कोरोना व्हायरसवर मात करण्यात ऑक्सफोर्ड विद्यापीठाची लस परिणामकारक ठरली. या लसीचा गाजावाजा जगभर होत असताना रशियानं मात्र आता खळबळजनक दावा केला आहे. रशियात तयार करण्यात आलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीच्या मानवी चाचण्या शंभर टक्के यशस्वी ठरल्या आहेत, असा दावा आता रशियातील संशोधन संस्थेकडून करण्यात आला आहे.
राजधानी माॅस्कोमधील गॅमेलिया रिसर्च इन्स्टिट्यूटनं विकसीत केलेल्या या लसीला ‘गाॅम कोविड-व्हॅक ल्यो’ असं नाव देण्यात आलं आहे. या लसीच्या मानवी चाचण्या मागील 42 दिवस सुरू होत्या. या लसीमुळं मानवी शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढत असल्याचं आता समोर आलं आहे.
या लसीच्या मानवी चाचणीत सहभागी स्वयंसेवकांना बुर्देन्को लष्करी रूग्णालयात लस टोचण्यात आली होती. या स्वयंसेवकांची पुन्हा एकदा वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यादरम्यान कोरोना व्हायरसची मुकाबला करण्याइतकी पुरेशी रोगप्रतिकारशक्ती त्यांच्यात तयार झाल्याची बाब समोर आली आहे.
गॅमेलिया इन्स्टिट्यूटच्या या लसीची राष्ट्राध्यक्ष ब्लादीमर पुतीन यांनीही प्रशंसा केल्याची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं दिली आहे. कोरोनाच्या या लसीचा लवकरात लवकर मान्यता मिळावी यासाठी देखील गॅमेलिया इन्स्टिट्यूट प्रयत्नशील असल्याची माहिती आहे.