माझ्याकडं दुसरा पर्याय नाही,पार्थ पवार म्हणाले ! ट्वीटमुळं चर्चेला उधाण

पुणे : राज्यातील मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यापासून मराठा समाजात अस्वस्थता आहे. मराठा संघटनांनी लढण्याची भूमिका घेतली आहे. याच मुद्दयावरून बीड जिल्ह्यातविवेक राहाडे या विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. बीड तालुक्यातील केतुरा गावातील हा तरुण आहे. आत्महत्येपूर्वी त्यानं चिठ्ठीही लिहून ठेवली आहे. याच घटनेच्या अनुषंगानं पार्थ पवार यांनी ट्वीट केलं आहे.


‘मराठा आरक्षणासाठी विवेक याने आत्महत्या केल्याचं ऐकून हादरून गेलो. अशा दुर्दैवी घटनांचं सत्र सुरू होण्याआधीच मराठा नेत्यांनी जाग व्हावं आणि आरक्षणासाठी लढायला हवं. महाराष्ट्र सरकारनंही यात तातडीनं लक्ष घालावं,’ असं पार्थ यांनी म्हटलं आहे.

https://twitter.com/parthajitpawar/status/1311371714236833792


‘विवेकनं आमच्या मनात पेटवलेली ज्योत संपूर्ण व्यवस्थेला भस्मसात करू शकते. एका संपूर्ण पिढीचं भवितव्य पणाला लागलंय. हे सगळं पाहता सर्वोच्च न्यायालयात जाण्याखेरीज माझ्यासमोर पर्याय नाही. सध्या न्यायालयापुढं मराठा आरक्षण प्रकरणात हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहे. माझ्या मनात पेटलेली ही मशाल पुढं नेण्यास मी तयार आहे. विवेकला आणि त्याच्यासारख्या लाखो तरुणांना न्याय मिळावा म्हणून मी न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहे,’ असंही पार्थ यांनी स्पष्ट केलं आहे. ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ असंही पार्थ यांनी ट्वीटच्या शेवटी म्हटलं आहे.


मराठा आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकार आपल्या परीनं लढाई लढत आहे. मात्र, सरकार गांभीर्यानं काही करत नसल्याचा मराठा संघटनांचा व विरोधकांचा आरोप आहे. छत्रपती शिवरायांचे वंशज उदयनराजे व संभाजीराजे भोसले यांनी अलीकडेच या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे. आता पार्थ पवारांनीही मैदानात उतरण्याची घोषणा केल्यानं राज्य सरकारची चिंता वाढण्याची शक्यता आहे.

error: Content is protected !!