औरंगाबाद: मुंबईहून शहरात अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. या माहितीवरून पंचवटी चौकात एका चारचाकी वाहनाला थांबवण्यात आले. वाहनाची तपासणी केली असता, त्यात अंमली पदार्थांचा साठा सापडला. त्यात चरस आणि एमडी होतं. ते जप्त करण्यात आले असून, दोघांना ताब्यात घेतले आहे.
मुंबईहून औरंगाबादमध्ये अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचे उघडकीस आले आहे. औरंगाबादच्या चौकात नगरसेवकाचा स्टिकर असलेल्या वाहनामध्ये चरस आणि एमडी सापडले आहे. ते जप्त करण्यात आले असून, दोघांना अटक केली आहे.
पंचवटी चौकात मंगळवारी, २९ सप्टेंबरला सकाळी सहा वाजताच्या सुमारास पोलीस आयुक्तांच्या दालनाचे पोलीस अधिकारी रोडे आणि भोसले यांना मिळालेल्या माहितीनुसार, एका चारचाकी वाहनामधून दोन जणांना ताब्यात घेतले. आशिक अली मुसा कुरेशी (४१, रा. कुर्ला) आणि नौरोद्दीन बद्रोद्दीन सय्यद (४०, रा. भारतनगर, वांद्रे) या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. वेदांतनगर पोलिसांसोबत विविध विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत वाहन तपासणी करण्यात आली. या वाहनातून चरस आणि मेफोड्रेन जप्त करण्यात आले. या प्रकरणी वेदांत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.