गोदामाय ओसंडून वाहू लागली,राजापूरला पाण्याचा वेढा


गेवराई :- दोन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसासह पैठणच्या नाथ सागरातून गोदावरी पात्रात सोडल्या जाणार्‍या पाण्यामुळे गेवराई तालुक्यातील गोदाकाठच्या गावानजीक पूर परिस्थिती निर्माण झाली असून राक्षसभुवन, राजापूरसह गोदाकाठच्या अन्य गावातील मंदिरे पाण्याखाली गेली असतानाच आज मात्र राजेगावला पाण्याने वेढा टाकल्याने त्या गावचा संपर्क तुटला आहे तर राष्ट्रीय महामार्ग ते राक्षसभुवन रस्त्यावरील गंगावडीनजीक पुल बांधकाम न झाल्याने या भागातील नागरिकांचाही संपर्क तुटल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

या भागातील गावचे गाव वाढत्या पाण्यामुळे रात्र जागून काढत असून तालुका प्रशासन मात्र आम्ही सतर्क आहोत, एवढं सांगून नामंनिराळं होतं त्या गावांकडे लक्ष देत नसल्याचा आरोप स्थानिक लोक करत आहेत. गेल्या दोन दिवसांच्या संततधार पावसासह पैठणच्या नाथसागरातून ९४ हजार क्युसेसने पाणी गोदावरी पात्रात येत असल्याने गोदामाय ओसंडून वाहत असून लाख क्युसेसपेक्षा अधिक पाणी सध्या गोदामाय आपल्या उदरातून वाहते ठेवीत असल्याने गेवराई तालुक्यातील नदीकाठच्या गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अमृता नदीच्या पुलावर पाणी आल्याने गंगावाडी, राक्षसभुवन, म्हाळसपिंपळगाव, ठाकरवाडी, पांचाळेश्वर यासह अन्य पाच ते सहा गावांचा संपर्क तुटला आहे. राजापूरला पाण्याचा वेढा पडत असून मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. राक्षसभुवनसह अन्य गावांतही पाणी घुसण्याचा धोका निर्माण झाला असून राजापूर येथील मंदिरासमोरील नंदी पाण्याखाली गेल्यानंतर गावाला धोका असतो हे आजपर्यंतचे गणित आहे. आज सकाळी सदरील मंदिरासमोरील नंदी पाण्याखाली गेल्यामुळे गावकर्‍यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

तालुका प्रशासन सतर्क असल्याच्या बाता मारत असले तरी प्रशासनाच्या एकाही अधिकार्‍याने या गावातील कुठल्याच गावांना भेटी दिल्या नाहीत. तहसीलदारची जागा रिक्त असल्यामुळे प्रभारी काम करत नसल्याची ओरड होत असून गोदावरी पात्रातून मोठ्या प्रमाणावर पाणी वाहू लागल्यामुळे परिसरातील अनेक गावांना सध्या धोका निर्माण झाला आहे.

error: Content is protected !!