भिवंडी : “मी गेल्या 12-15 वर्षांपासून या बिल्डिंगमध्ये राहतोय. घरी माझी बायको, 3 मुलं आणि मी. सुदैवाने महिन्याभरापूर्वी मी बायको आणि मुलांना गावी पाठवून दिलं. घरी मी एकटाच होतो. रोज रात्री मी अम्मीच्या घरी जेवून माझ्या घरी येऊन झोपायचो. त्या दिवशी रात्री मी 2 वाजता घरी आलो. माझं वायफाय चालत नव्हतं म्हणून रेकॉर्डेड वेब सीरिज पहात होतो. 3 वाजता झोपायच्या आधी मी प्यायला उठलो. बाटली उचलायला गेलो आणि माझ्या अंगावर ढिगारा कोसळला. काही कळलंच नाही. फक्त इतकंच आठवतंय की उडी मारून मी पलंगाच्या खाली जायचा प्रयत्न केला. पुढच्या तासाभरातलं मला काही आठवत नाही.
“माझ्या डोक्याजवळ 2 फुटांवर एक बीम येऊन कोसळला होता. माझे दोन्ही पाय ढिगाऱ्याखाली अडकले होते. तासभर सगळीकडे धूळ होती. श्वास कोंडत होता. असं वाटलं की आता माझे दोन्ही पाय कामातून गेले. अल्लाला म्हटलं की माझं आयुष्य उरलं असेल तर मला वाचव, पण जर माझ्या नशिबी मृत्यू असेल तर अशी मौत नको…लगेच जीव जाऊ दे. तासाभरातने धूळ-माती खाली बसली. मग जरा मी आजूबाजूला पहात काय झालंय याचा अंदाज घेतला.”पायातून रक्त वाहात असल्यासारखं वाटत होतं. दोन्ही पाय अडकलेले होते. म्हणून हातांनी आजुबाजूला चाचपडून पाहिलं. माझा हात पुढपर्यंत जात होता. मग मी हळूहळू हाताने एकेक वीट करत पायांवरचा ढीग हटवायला सुरुवात केली. हळुहळू पाय मोकळे झाले. हाताने माझ्या आजूबाजूच्या गोष्टी काढून मी त्या पुढे ढकलून दिल्या. शेवटी मला दोन्ही पाय काढून घेता आले. पाय मोडला तर नाही ना, हे तपासलं. मग जरा बरं वाटलं.
“मग नंतर मी माझा मोबाईल शोधू लागलो. कारण मग मदतीसाठी कोणाला कॉल करता आला नसता. माझ्या बेडवर आख्खा स्लॅब कोसळून आला होता. बेड आणि बीम यांच्यामध्ये एक पोकळी तयार झाली होती आणि मी त्यात होतो. हाताने चाचपडत मी बेडवरचा मोबाईल शोधला.मोबाईलच्या स्क्रीनला हात लागताच स्क्रीन उजळला. त्यावेळी इतका अंधार होता की मला माझा हातही दिसत नव्हता. पण त्या उजेडाने मला इतकं बरं वाटलं…माझ्या आशा जाग्या झाल्या. मोबाईल हातात घेऊन पाहिला. टचस्क्रीन व्यवस्थित चालत होता, स्क्रीन सुस्थितीत होता. मी टॉर्च ऑन करून आजूबाजूला पाहिलं…माझं सगळं घर 2 फुटांचं झालं होतं.
“मोबाईलचं नेटवर्क येतंय का हे तपासायचा प्रयत्न केला…मी मोबाईल रिपेअर करतो. ऑटोमॅटिक मोडला फोन 4Gच शोधत राहील हे मला माहिती होतं. म्हणून मी आधी 2G शोधलं…मग 3G…मग 4G…नेटवर्क येणार नाही, हे मला समजलं.
“तेवढ्यात लक्षात आलं की आपण पाणी प्यायला उठलो होतो. म्हणून पाण्याची बाटली शोधायला सुरुवात केली. ढिगाऱ्यात मला पाण्याची बाटली सहीसलामत सापडली…त्यात पूर्ण 1 लीटर पाणी होतं. 1 लीटरची ती पाण्याची बाटली मिळाल्यावर वाटलं, की आता कदाचित मी वाचू शकतो. श्वास घेता येत होता, जवळ पाणी होतं…मग मी घोटभर पाणी पिऊन जरा रिलॅक्स झालो.
“NDRF वाले कधी माझ्यापर्यंत पोहचणार…मी पहिल्या मजल्यावर होतो. ते आधी तिसरा मजला साफ करणार, मग दुसरा आणि मग माझ्यापर्यंत येणार…मला वाटलं की ते माझ्यापर्यंत पोहोचायला 2 दिवस लागतील. तोपर्यंत हे पाणी मला पुरवायचं होतं. तेव्हा मला पाण्याचं महत्त्वं समजलं.