रामदास आठवले – मराठा समाजाला आरक्षण मिळालचं पाहिजे, ही माझी भूमिका आहे. ही मागणी सर्वात आधी मी केली होती. मंडल आयोगाच्या शिफारसी लागू करा या मागणीसाठी भारतीय दलित पँथरच्या काळात आम्ही अनेक आंदोलनं केली होती. तेव्हा जे ओबीसी होते त्यांनासुद्धा वाटत होतं की आम्ही बॅकवर्ड नाही. पण कोरोना काळात मराठा समाजानं मोठी आंदोलनं केली तर महाराष्ट्रात कोरोना पुन्हा वाढेल आणि त्याची संख्या दुप्पट होण्याची शक्यता आहे, असं केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.
आर्थिकदृष्ट्या मजबूत असला किंवा मंत्रिमंडळात आणि सत्तेच्या राजकारणात त्यांचा बोलबाला असला तरी मराठा समाजात 60 ते 65 टक्के लोक असे आहेत ज्यांना आपल्या मुलांचं शिक्षण करणं अशक्य आहे. त्यांना आजारपणावर लाख-दोन लाख खर्च करणं अशक्य आहे. पावसाच्या भरवशावर अनेक शेतकरी आहे. त्यामुळे मराठा समाजात अनेक जण आर्थिकदृष्ट्या मागासलेले आहेत. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे.
पण ते आरक्षण ओबीसीमध्ये देऊ नये. ओबीसींना त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत आरक्षण नाही. त्यामुळे मराठ्यांना ओबीसींमध्ये टाकून आरक्षण देणं हे अत्यंत अयोग्य आहे. दोघांच्या वादामध्ये अनेक अडचणी निर्माण होतील. पण मराठा समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे या मताचा मी आहे. सगळ्या श्रीमंत मराठ्यांना देऊ नका पण गरिबांना द्या. मराठा समाजानं पुकारलेल्या आंदोलनाला माझा पूर्णपणे पाठिंबा आहे.