मुंबई, 26 सप्टेंबर : देशात कोरोनाचा संसर्ग कमी होण्याचं नाव घेत नाहीय. महत्त्वांच्या शहरांपाठोपाठ आता ग्रामीण भागात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान लशींच्या स्पर्धेत रशियानं जरी पहिला नंबर लावला असला तरी या लशीसंदर्भात जागतिक स्तरावर अनेक सवाल उपस्थित होत आहेत. याच दरम्यान मोठी बातमी हाती आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ऑक्सफोर्डच्या लशीबाबत अनेक बातम्या येत असताना पुन्हा एकदा चाचणी सुरू झाली आहे. आता मुंबईतील केईएम रुग्णालयातील तीन जणांना या लशीचा डोस शनिवारी दिला जाणार आहे.
टाइम्स ऑफ इंडियानं दिलेल्या वृत्तानुसार मुंबईतील KEM रुग्णालयातील तीन जणांवर मानवी चाचणी शनिवारी करण्यात येणार आहे. या चाचणीचे तीन जणांवरील परिणाम आणि निकाल काय येतात याकडे अवघ्या मुंबईसह जगाचं लक्ष लागलं आहे. केईएम हॉस्पिटलचे डीनने दिलेल्या माहितीनुसार ऑक्सफोर्ड विद्यापीठाने कोरोना विषाणूची विकसित केलेली कोविशिल्ट लस रुग्णालयात तीन व्यक्तींवर मानवी चाचणी केली जाईल. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही लस देण्याआधी 13 लोकांची तपासणी कऱण्यात आली होती. त्यातून 3 जणांची निवड करण्यात आली आहे. आजपासून मानवी चाचणीची प्रक्रिया केईएममधील 3 जणांवर सुरू होईल.
सीरम इंन्स्टिट्यूटनं पुण्यातील ससून रुग्णालयात कोरोनाच्या लशीची चाचणी सुरू केली आहे. ऑक्सफोर्डची कोरोना लस सध्या तिसऱ्या टप्प्यात असून काही कारणांमुळे ही चाचणी SIIनं या महिन्याच्या सुरुवातीला थांबवली होती मात्र पुन्हा एकदा ही चाचणी सुरू कऱण्यासाठी परवानगी दिल्यात आल्यानंतर आता KEM रुग्णालयातील 3 जणांना लस देण्यात येत आहे. या लशीचे परिणाम आणि निकाल काय येतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.