मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा फोटो एडिट करून त्यांचा मौलवीच्या वेशातील फोटो ट्विटरवर पोस्ट करणाऱ्या सुनयना होले नावाच्या महिलेविरुद्ध मुंबईतील सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सदर महिलेला अटक करून नंतर जामिनावर सोडण्यात आले आहे. या महिलेला जामीन मिळावा म्हणून दिल्ली भाजपचे प्रवक्ते ताजिंदर पाल बग्गा यांच्या सांगण्यावरून भाजप युवा मोर्चाचे देवांग दवे यांनी मदत केल्याचेही समोर आले आहे.
सुनयना होले नावाच्या महिलेने आपल्या ट्विटर हँडलवरून २५ जुलै रोजी आक्षेपार्ह फोटो व मजकूर पोस्ट केला आहे. मुख्यमंत्री ठाकरे व पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा फोटो एडिट करून पोस्ट करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांना मौलवीच्या वेशात दाखवण्यात आले आहे तर आदित्य यांच्या फोटोत साप दूध पितानाचा फोटो इन्सर्ट करण्यात आला आहे. त्यानंतर २८ जुलै रोजी आणखी एक ट्विट करण्यात आले असून त्यात अत्यंत खालच्या पातळीवरील भाषेचा वापर करण्यात आला आहे. ट्विटमध्ये #SushantSinghRajput #CBICantBeDeniedForSSR हे हॅशटॅग वापरण्यात आले आहेत. या दोन्ही ट्विटवर तीव्र आक्षेप घेत अॅड. धर्मेंद्र मिश्रा यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली होती.