मुंबई – मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जे काही योग्य आहे ते करावं, ओबीसी आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालं तर चांगले आहे. पण २०११ च्या जगणनेनुसार ५२ टक्के ओबीसींना २७ टक्के आरक्षण आहे. म्हणजे लोकसंख्येच्या तुलनेत आरक्षण कमी आहे. पण जर वेळ आली तर ओबीसी समाज काळीज मोठं करुन मराठा समाजातील वंचितांना आरक्षण देऊ शकतो. आरक्षण मिळालं पाहिजे ही सगळ्यांची भूमिका आहे असं राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी म्हटलं होतं.
मराठा आरक्षणाला सुप्रीम कोर्टात स्थगिती दिल्यानंतर राज्यभरात मराठा कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. मराठा समाजाला आरक्षण द्या, मगच नोकर भरती करा अशी आग्रही मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. मात्र सुप्रीम कोर्टाच्या एका स्थगितीमुळे मराठा समाजाने घाबरू नये, कोर्टाचा निकाल मराठा समाजाच्या बाजूने लागेल असा विश्वास वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला आहे.
याबाबत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ओबीसीचं म्हणणं आहे आमचं ताट आमच्याकडेच राहू द्या, आमच्या ताटात वाटणी नको, आम्हाला कोणी नको आहे. मराठ्यांना आरक्षण द्यावं पण आमच्या ताटातलं मिळू नये, अशी मागणी ओबीसी समाजातून येत असल्याचं सोशल मीडियातून वाचायला मिळत आहे. त्यामुळे सर्व मराठा पुढाऱ्यांना विनंती आहे त्यांनी मराठा आरक्षण गुंतागुंतीचा करू नका, ओबीसीमध्ये हिस्सा मागण्याच्या भानगडीत पडू नये, मराठा फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित आहे. राज्यात मराठा समाज १६ टक्के आहे पण देशभरात केवळ २ टक्के आहे असं त्यांनी सांगितले.