ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर काळाच्या पडद्याआड

सातारा :’काळूबाईच्या नावानं चांगभलं’ या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना करोनाची लागण झाली. आशालता यांच्यासह काळूबाईच्या सेटवर काम करणाऱ्या २७ जणांना करोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे मालिकेच्या चित्रीकरणासाठी मुंबईवरून एक डान्स ग्रुप बोलावण्यात आला होता. यांच्यामार्फत करोनाची लागण झाल्याचं बोललं जात होतं. करोनाचा संसर्ग झाल्यानंतर सोमवारी अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.


मूळच्या गोव्याच्या असलेल्या आशालता यांनी कोकणी व मराठी चित्रपटांतून अभिनयाला सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. हिंदी सिनेसृष्टीतही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती. त्यांनी विविध भाषांतील १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. छोट्या पडद्यावरील अनेक टीव्ही मालिकांमध्येही त्या झळकल्या होत्या. संगीत नाटक मत्स्यगंधाच्या माध्यमातून त्यांनी नाटकातील कारर्कीदीस सुरुवात केली. त्यानंतर ‘गुंतता हृदय हे, रायगडाला जेव्हा जाग येते, चिन्ना आणि महानंदा’ अशा नाटकांमध्ये त्यांनी प्रमुख भूमिका साकारल्या. बासू चटर्जी यांच्या ‘अपने पराये’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. याच चित्रपटातील सहायक अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी त्यांना फिल्म फेअरसाठी उत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचं नामांकनही मिळालं होतं. मराठी चित्रपटसृष्टीत ‘उंबरठा, सूत्रधार, नवरी मिळे नवऱ्याला, वहिनीची माया, माहेरची साडी’ हे त्यांचे गाजलेले चित्रपट होते.


आशालताताईंनी पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे गिरवले होते. ह्या शिक्षणाचा त्यांना अभिनय क्षेत्रातही उपयोग झाला होता. संगीत विषयावर आधारीत ‘गर्द सभोवती’ हे पुस्तकही त्यांनी लिहिलं होतं.

प्रेमळ व्यक्तिमत्त्व व कसदार अभिनयाने मराठी, हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता बावगावकर यांचं आज निधन झालं. त्या ७९ वर्षांच्या होत्या. करोनाची लागण झाल्यानंतर त्यांना साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथंच आज सकाळी पावणे पाचच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!