बीड (प्रतिनिधी):- बीड शहरातून धुळे-सोलापूर हा महामार्ग जातो. या महामार्गाला बाह्य वळण रस्ता झाल्याने शहरातील जिरेवाडी, जालना रोड, बार्शी रोड या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष झालेले आहे. शहरातील या रस्त्याचे नुतनीकरण करण्यात यावे यासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर(sandeep kshirsagar) यांचा खा.शरदचंद्रजी पवार साहेब, ना.अजित दादा पवार, खा.सुप्रियाताई सुळे, ना.जयंत पाटील, पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. सध्या या रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडले असून खड्डे बुजवून लवकरच नुतनीकरण व पक्के डांबरीकरण करण्याचे काम हात घेण्यात येणार आहे. जिरेवाडी, जालना रोड, बार्शी रोड ते बायपासपर्यंत हे खड्डे बुजवले जाणार असून यासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांचा सातत्याने प्रयत्न सुरू होता. त्यांच्या प्रयत्नांना आता यश आले असून काम दर्जेदार करून घेण्यासाठी त्यांची यंत्रणा रस्त्यावर उभी राहून काम करून घेईल असा विश्वास जनतेला आहे.
बीड शहरातून धुळे-सोलापूर हा महामार्ग गेलेला आहे. या रस्त्याला 12 कि.मी.चा बाह्य वळण रस्ता करण्यात आला. या बायपासमुळे शहरातील मुळ रस्त्याकडे महामार्गाच्या अधिकार्यांचे, यंत्रणेचे दुर्लक्ष झाले. या रस्त्याला नाल्या, त्याचे उतार, त्याचे डांबरीकरण, सिमेंट काँक्रीटीकरण, नुतनीकरण करण्यात यावे यासाठी आ.संदिप भैय्या क्षीरसागर यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. याबाबत त्यांनी प्रकल्प संचालक यांच्यापासून नागपुर, मुंबई आणि दिल्लीपर्यंत पत्र व्यवहार करत खा.शरदचंद्रजी पवार साहेब, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार, खा.सुप्रियाताई सुळे, ना.जयंत पाटील, ना.धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून थेट केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्यापर्यंत पत्र व्यवहार केलेला आहे. या रस्त्याचे नुतनीकरण करण्याबाबतच्या हालचाली सुरू असतांना त्यात तांत्रिक अडचणी येवू लागल्याने या रस्त्यावरील पडलेले खड्डे तातडीने बुजवण्यात यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांच्या मागणीची दखल घेवून राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प संचालक यांनी जिरेवाडी,जालना रोड,बार्शी रोडवरील खड्डे बुजवण्याच्या काम हाती घेतले आहे.