औरंगाबाद, 20 – मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडून अंतरिम स्थगिती मिळाल्यानंतर मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे रविवारी दि.२० रोजी सकाळी मराठा क्रांती ठोक मोर्चाचे मुख्य समन्वयक रमेश केरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आज क्रांती चौकात मराठा क्रांती ठोक मोर्चाचे आंदोलक आंदोलनास्थळी दाखल होताच पोलीसांनी अटक केली.
यावेळी एक मराठा लाख मराठा, मराठा आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, पोलीस भरतीला स्थगिती मिळालीच पाहीजे या घोषणेणे परिसर दणाणुन सोडला होता. पोलीसांनी दडपशाही करून आंदोलन हाणुन पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
मराठा समाजाला राज्य सरकारने दिलेले सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने तात्पुरते स्थगित केले. या निर्णयामुळे राज्यातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. मराठा समाजाच्या उमेदवारांना नोकरीच्या राखीव जागापासून वंचित राहावे लागत आहे. मराठा समाजाची आर्थिक सामाजिक परिस्थिती अत्यंत खालावलेली आहे हे राज्य मागास आयोगाच्या अहवालानुसार स्पष्ट झाले आहे. असे असताना मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने काढून घेण्यात आले. आरक्षणाला मिळालेली स्थगिती तात्काळ उठविण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात अर्ज दाखल करावा या त्यासाठी मराठा समाजाने आंदोलनाचे शस्त्र उपसले आहे. या आंदोलनात समन्वयक पंढरीनाथ गोडसे, भरत कदम, किरण काळे पाटील, मनोज पाटील मुरदारे, उदयराज गायकवाड, संतोष धांडे पाटील, राजेंद्र हारणे, पुंडलीक कोलते यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.