मुंबई : जवळपास २० ते २४ हजार नवीन करोना रुग्ण आढळत असून यातील गंभीर रुग्णांना करोना रुग्णालयात उपचारासाठी बेड मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे सौम्य लक्षणे असलेल्या करोना रुग्णांना यापुढे उपचारासाठी ‘करोना केअर सेंटर’ ( सीसीसी) मध्ये किंवा घरीच उपचाराखाली ठेवण्याचा निर्णय आरोग्य विभागाने जारी केला आहे. सौम्य करोना रुग्णांना यापुढे करोना रुग्णांसाठीच्या रुग्णालयात बेड न देण्याची निर्णय घेण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाने आज संबंधितांची बैठक घेऊन सौम्य लक्षणे असलेले करोना रुग्ण पन्नाशीच्या आतील असतील तसेच कोमॉर्बीड म्हणजे मधुमेह, उच्च रक्तदाब आदी आजार नसतील तर त्यांना घरीच क्वारंटाइन करावे किंवा करोना उपचार केंद्रात दाखल करावे असा निर्णय घेतला आहे. याबाबतचे आदेश आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी आदेश जारी केला आहे. त्याचप्रमाणे अनेक जिल्ह्यात करोनासाठी नियोजित नसलेल्या रुग्णालयात परस्पर दाखल केले जाते तसेच त्याची माहितीही यंत्रणेला देणे बंधनकारक असताना दिली जात नाही. अशा रुग्णालयांवर तात्काळ कडक कारवाई करण्याचे आदेश सिव्हिल सर्जन यांना देण्यात आले आहेत.