मद्यधुंद हवालदाराचा गोंधळ; महिला पोलिसाला शिवीगाळ

पुणे: पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील दिघी पोलीस ठाण्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या ठिकाणी एक मद्यधुंद पोलीस कर्मचाऱ्याने महिला पोलीस कर्मचारीस शिवीगाळ केल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री उशीरा ही घटना घडली आहे.याप्रकरणी संबंधित महिला पोलीस कर्मचारीने दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलीस कर्मचारी मारुती बढेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ते दिघी पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून कार्यरत आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला पोलीस कर्मचारी फिर्यादी या दिघी पोलीस ठाण्यात ठाणे अंमलदार मदतनीस म्हणून शुक्रवारी रात्रपाळी ड्युटीवर होत्या. तर आरोपी पोलीस कर्मचारी बढेकर हे चऱ्होली येथे मार्शल म्हणून रात्रपाळी ड्युटीवर होते. मात्र, ते तिथे न थांबता मद्यपान करून मद्यधुंद अवस्थेत दिघी पोलीस ठाण्यात गेले आणि पोलीस ठाण्यात हजर असलेल्या कर्मचाऱ्यांसमोर फिर्यादी महिला पोलीस कर्मचारी यांना शिवीगाळ केली, अशी माहिती दिघी पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, शिस्तप्रिय पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यावर काही निर्णय घेणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल-पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश

“संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल. कर्तव्यावर असताना मद्यपान करणे चुकीचे आहे. नेहमी गैरहजर राहणाऱ्या आणि मद्यपान करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची यादी काढली जाईल. पोलिसांची प्रतिमा मलिन होईल, असे कृत्यं केल्यास संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल.” असा इशारा पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिला आहे(Commissioner of Police Krishna Prakash).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!