काँग्रेसचा फडणवीसांवर हल्ला, ही तर फडणवीसांची बौद्धिक दिवाळखोरी

मुंबई: डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली देश रसातळाला गेला असे म्हणणाऱ्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचे प्रदर्शन केले आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्यानंतर डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली देशात पहिल्यांदाच दोन आकडी सकल महसूल उत्पन्न वाढ (जीडीपी) नोंदवली गेली, ज्यांच्या १० वर्षाच्या काळात भारताचा सरासरी विकास वाढीचा दर ७.५ टक्के राहिला .

बाळासाहेब थोरात म्हणतात

याच तिमाहीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाने जीडीपीच्या अधोगतीचा ऐतिहासिक उच्चांक गाठला आणि रसातळ काय असतो याची ओळख मोदींनी स्वतःच देशाला पटवून दिली आहे, असा टोला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी फडणवीस यांना लगावला आहे.

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह यांच्या नेतृत्वाखाली भारताने ऐतिहासिक विकास दर गाठला. एवढेच नव्हे तर त्या विकासाचा उपयोग हा जनहितासाठी करून दारिद्रय रेषेखाली असलेल्या १४ कोटी जनतेला गरिबी रेषेच्या वर आणले. यातून नवीन सकारात्मक आर्थिक वर्गवारी देशाला पहायला मिळाली. अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन करून जगाच्या इतिहासात प्रथमच अन्न सुरक्षा कायदा आणला. रोजगाराची हमी देणारी मनरेगा योजना आणली. कोणीही शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून शिक्षणाचा अधिकार दिला. ज्या डॉ. मनमोहनसिंह यांच्याबदद्ल अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष म्हणाले होते की, जेव्हा डॉ. मनमोहनसिंह बोलतात तेव्हा जग ऐकते, त्यांच्याबदद्ल फडणवीसांनी अशा तऱ्हेचे बोलणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!