पुणे : कोरोनामुळे सगळ्यांच्या जगण्याचीच दिशा बदलली आहे. अनेक संसार कोलमडून गेले आहेत. आपल्या हक्काची जीवलग माणसे सोडून गेल्याने अनेक कुटूंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पुण्यात कोरोनामुळे एका कुटुंबात कर्त्या माणसाचं निधन झालं. पतीच्या मृत्यूमुळे खचलेल्या पत्नीने काही दिवसांमध्ये आत्महत्या केली. त्यांना दोन मुलं असून ती मुलं आता पोरकी झाली आहेत. वडिलांचं अकाली निधन झालं आणि आता आईसुद्धा सोडून गेल्याने या मुलांच्या आक्रोशाने सगळ्यांचेच डोळे पाणावले आहेत.
भोसरी जवळच्या फुलेनगर परिसरात खजुरकर हे कुटुंब राहातं. गुरुबसप्पा आणि त्यांच्या पत्नी गोदावरी हे दोन मुलांसह राहतात. गुरुसप्पा यांचं दोन महिन्यांपूर्वी कोरोनाने निधन झालं. घरचा आधारच गेल्याने गोदावरी या खचल्या होत्या. घरची हालाखिची आर्थिक स्थिती आणि पाठिशी असलेली दोन मुलं यांचा सांभाळ कसा करायचा असा प्रश्न त्यांना पडला होता.
गुरुसप्पा हे टिव्ही फिटींग, दुरुस्ती अशी काम करून आपला उदरनिर्वाह चालवत होते. तेच गेल्याने खचलेल्या गोदावरी यांनी शुक्रवारी (18 सप्टेंबर) पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना दोन मुलं असून मुलगा 11 वर्षांचा तर मुलगी 7 वर्षांची आहे. आई आणि बाबा दोघेही सोडून गेल्याने त्यांना आता फक्त त्यांच्या आजीचा आधार आहे.