संजय राऊत यांचा दावा,एनडीए आणि भाजपात फार जिव्हाळ्याचे संबंध राहिलेले नाहीत

शिवसेना जेव्हा बाहेर पडली तेव्हाच एनडीए विस्कळीत झाली असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एनडीए आणि भाजपात फार जिव्हाळ्याचे सबंध राहिलेले नाहीत असंही ते म्हणाले आहे. शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या हरसिमरत कौर यांनी कृषी विधेयकांना विरोध दर्शवत केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

“शिवसेना जेव्हा बाहेर पडली तेव्हाच एनडीए विस्कळीत झाली. बाहेर पडली म्हणजे आम्हाला बाहेर पडण्यासाठी भाग पाडण्यात आलं,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, “टीडीपीचं काही नक्की नसतं, ते येऊन जाऊन असतात. फक्त शिवसेना आणि अकाली दल एनडीएमधील सर्वात जुने, जाणते आणि निष्ठावान होते. बाकी नितीश कुमार येऊन जाऊन असतात. त्यांचं उद्याचं काही सांगू शकत नाही. माझ्या माहितीप्रमाणे एनडीए आणि भाजपात फार जिव्हाळ्याचे सबंध राहिलेले नाहीत”.

“आम्ही अद्यापही जुने संबंध विसरु शकत नाही. आम्ही एनडीएचा महत्त्वाचा शेवटचा स्तंभ होतो,” असं संजय राऊत यांनी यावेळी सांगितलं. “एनडीएत कृषी विधेयकांवर चर्चा व्हायला हवी होती. सर्वपक्षीय तर सोडून द्या पण जर एनडीएमध्ये कृषी क्षेत्राशी संबंधित काही निर्णय होत आहेत तर धोरणात्मक चर्चा झाली असती तर बरं झालं असत,” असं मत संजय राऊत यांनी यावेळी व्यक्त केलं.

“कृषी विधेयकांवर चर्चाच झालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान आणि व्यापाऱ्यांचा फायदा होईल असं सर्वांचं म्हणणं आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसह शरद पवार यांच्याशी बोलणार आहे,” अशी माहिती संजय राऊत यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!