पुणे । राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी करण्यासाठी पहाटे सहा वाजता पोहोचले होते. तसे पाहिले तर अजित पवार यांना त्यांची महत्त्वाची कामे पहाटे करण्याची सवय आहे. सहा वाजण्याच्या सुमारास शहरात येऊन पिंपरी-चिंचवड ते पुणे मेट्रोचा आढावा घेत अजित पवारांनी मेट्रोचे मुख्य अधिकारी ब्रिजेश दीक्षित यांच्यासोबत बैठक घेतली. त्यानंतर संत तुकाराम नगर येथे मेट्रोचे पहिले तिकीट घेऊन अजित पवार यांनी मेट्रो प्रवास केला.(pune metro first ticket purchased by ajeet pawar)
अजित पवार पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास फुगेवाडी येथे दाखल झाले होते. अजित पवार आपल्या वेळेच्या तंतोतंत नियोजनामुळे ओळखले जातात. आज मेट्रो अधिकाऱ्यांना त्याचा प्रत्यय आला.
अजित पवारांनी पहाटे पिंपरी-चिंचवड शहरात दाखल झाल्यानंतर मेट्रो संदर्भातील बैठक घेतली. यावेळी मेट्रोचे ब्रिजेश दीक्षित(birijesh dikshit) उपस्थित होते. बैठक झाल्यानंतर अजित पवार यांच्या गाड्यांचा ताफा संत तुकाराम नगर मेट्रो स्थानकाकडे वळाला. मेट्रोचे आढावा घेतल्यानंतर मेट्रोचे पहिले तिकीट हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले. संत तुकाराम नगर ते पिंपरी (खराळवाडी) असा मेट्रोने त्यांनी प्रवास केला. यावेळी अजित पवार हे मेट्रो चालकाच्या केबिनमधून आढावा घेत होते, तर ब्रिजेश दीक्षित त्यांना मेट्रोबद्दल माहिती देत होते. पाहणी दौऱ्यात मोजके पोलीस अधिकारी आणि मेट्रो कर्मचारी उपस्थित होते. मेट्रो संदर्भात अजित पवार यांनी काही सूचना देखील केल्या असून माध्यमांना प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.