केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडल्या आहेत. कृषी क्षेत्राशी संबंधित विधेयकं लोकसभेत मांडली जाणार असून मतदान होण्याच्या आधीच हरसिमरत कौर बादल राजीनामा दिला आहे. हरसिमरत कौर बादल यांच्या शिरोमणी अकाली दल पक्षाने विधेयकांचा विरोध केला असून शेतकरी विरोधी असल्याचं म्हटलं आहे. पीटीआयने यासंबंधी वृत्त दिलं आहे.
केंद्र सरकार आणि भाजपाला समर्थन असेल पण शेतकरी विरोधी राजकारणाचं समर्थन करणार नाही असं स्पष्ट केलं. भाजपाने विधेयकं कृषी क्षेत्रात मोठे बदल घडवेल असा विश्वास व्यक्त केला आहे. मात्र या विधेयकांमुळे गेल्या अनेक आठवड्यांपासून आंदोलन करणाऱ्या पंजाब आणि हरियाणामधील शेतकऱ्यांची मोठी निराशा झाली आहे.
विधेयकांवरील चर्चदरम्यान सुखबीर सिंह बादल यांनी प्रस्तावित कायद्यांमुळे पंजाब सरकारने कृषी क्षेत्र उभं करण्यासाठी केलेली ५० वर्षांची मेहनत वाया जाईल अशी टीका केली. यावेळी त्यांनी पंजाबने भारताला धान्य निर्मितीत स्वावलंबी होण्यामध्ये निभावलेल्या भूमिकेचा उल्लेख केला. यावेली त्यांनी हरसिमरत कौर बादल सरकारमधून राजीनामा देतील अशी घोषणा केली. मोदी सरकारमध्ये शिरोमणी अकाली दलचं प्रतिनिधित्व करणाऱ्या हरसिमरत कौर बादल एकमेक सदस्य आहेत.