राजकीय नेत्याची गाडीतच विष घेऊन आत्महत्या

दिल्ली : सोनिपतमध्ये आम आदमी पक्षाचे नेते निशांत तंवर यांनी दिल्ली – पानीपत हायवेवर आपल्या गाडीत आत्महत्या करून जीवन संपवल्याचं समोर आलंय. बहालगढनजिक गाडी उभी करून निशांत तंवर यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

निशांत तंवर यांच्या भावानं दिल्ली कॅन्टोन्मेंटमधील नगरसेवक आणि आपले शेजारी संदीप तंवर यांच्यावर आपल्या भावाला आत्महत्येस भाग पाडल्याचा आरोप केलाय. पोलिसांनी मृताच्या भावाच्या आरोपांनंतर तक्रार दाखल केलीय. उल्लेखनीय म्हणजे, संदीप तंवर यांनी चार दिवसांपूर्वी मृत निशांत तंवर, त्यांचा भाऊ आणि आई – वडिलांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केला होता.

दिल्ली पानीपत हायवेवर बहालडढनजिक साई सेंटरच्या समोर एक गाडी उभी होती. या गाडीत एक तरुण अर्धनग्न अवस्थेत बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्यानं विष प्राशन करून आपलं जीवन संपवण्याचा प्रयत्न केला होता. उपस्थितांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना कळवली आणि तरुणाला रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांच्या चौकशीत हा तरुण दिल्लीचा रहिवासी निशांत तंवर असल्याचं समोर आलं.

निशांत यांचा भाऊ निशिल तंवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, निशांत आम आदमी पक्षाचा वार्ड – २ चा अध्यक्ष होता. निशांतविरुदध दिल्ली कँटचे नगरसेवक संदीप तंवर यांनी १२ सप्टेंबर रोजी तक्रार नोंदवली होती. संदीपनं निशांत, त्याचा भाऊ निशिल आणि आई-वडिलांविरोधात कलम ३०८ नुसार गुन्हा दाखल केला होता.

संदीप वारंवार कुरापती काढणं, शिवीगाळ करणं अशा प्रकारांनी निशांतला त्रास दिला जात होता, असं निशिल यांचं म्हणणं आहे. आपल्याविरोधात संदीपनं दाखल केलेली तक्रारदेखील खोटी असल्याचं त्यांनी म्हटलंय. याच दबावाखाली येऊन निशांत यांनी आपलं आयुष्य संपवल्याचा दावा भाऊ निशिलनं केलाय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!