मुंबई: राज्यातील कोविड सेंटर आणि इतरही ठिकाणी महिला अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून महिला सुरक्षेच्या विषयात राज्य सरकारचे दुर्लक्ष होत आहे. सरकारने हा विषय गांभीर्याने घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात. तसेच कोविड आणि क्वारंटाइन केंद्रात महिला सुरक्षेचे एसओपी तातडीने तयार करावेत, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
हे वाचा : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना करोनाची लागण
राज्यातील महिलांवर वाढलेले अत्याचार, त्यांच्या सुरक्षेसाठी करावयाच्या आवश्यक उपाययोजना इत्यादींबाबत यापूर्वी सुद्धा पत्रव्यवहार केला होता आणि एसओपी तयार करण्याची मागणी केली होती. पण, त्यासंदर्भात अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, त्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले. राज्य सरकार महिला सुरक्षेबाबत कोणतीही खबरदारी घेताना दिसत नाही. अन्य विषयांवर हिरीरीने बोलणारे, दिवसांतून अनेक वेळा टीव्हीवर येणारे चेहरे या विषयावर साधा निषेध करताना सुद्धा दिसून येत नाही, हे आजचे वास्तव आहे. असंवेदनशीलतेचा हा कळस आहे, असेही फडणवीस यांनी पत्रात म्हटले आहे.