मुख्यमंत्री आज राज्यातील जनतेशी संवाद साधणार

मुंबई:करोना साथीच्या सुरुवातीच्या काळात अधूनमधून राज्यातील जनतेशी संवाद साधणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बऱ्याच दिवसांनंतर आज पुन्हा एकदा बोलणार आहेत. करोनाचा वाढता संसर्ग, सुशांतसिंह व कंगना राणावत प्रकरण व नौदल अधिकाऱ्यांना शिवसैनिकांकडून झालेली मारहाण अशा अनेक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री प्रथमच बोलत आहेत. त्यामुळं ते नेमकं काय बोलणार आणि काय भूमिका मांडणार याकडं महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

आज दुपारी एक वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक घडामोडी घडत आहेत. सुशांतसिंह राजपूत प्रकरण, कंगना राणावत हिनं मुंबईबद्दल केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य याचीच चर्चा सर्वत्र सुरू आहे. विरोधी पक्षानं या प्रकरणांवरून ठाकरे सरकार व शिवसेनेला धारेवर धरलं आहे. या सगळ्या गदारोळात करोनासारख्या गंभीर विषयावरची चर्चा मागे पडल्याचं चित्र आहे.

शिवसेनेवर झालेल्या आरोपांना नेत्यांनी आपापल्या परीनं उत्तरं दिली आहेत. मात्र, मुख्यमंत्री ठाकरे हे प्रथमच जनतेशी संवाद साधणार आहेत. त्यात ते केवळ करोनाबद्दल बोलतात की इतर विषयांवरही भाष्य करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कंगना प्रकरणात मुंबई महापालिकेनं केलेल्या कारवाईवरून सरकारवर टीका होत आहे. राज्यपालांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसंच, नौदल अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. या साऱ्याबद्दल उद्धव ठाकरे बोलतात का, याबद्दलही उत्सुकता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!