माजी नौदल अधिकाऱ्याला झालेली मारहाण तसंच कंगना प्रकरणावरुन खासदार चिराग पासवान यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा अशी मागणी त्यांनी केली आहे
बिहार विधानसभा निवडणुकीआधी राजकारण जोरदार तापलं आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरण आणि कंगना प्रकरणावरुन राजकीय पक्षांनी आपापल्या पोळ्या भाजण्यास सुरुवात केली आहे. या दोन्ही मुद्द्यावर आता लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, असं म्हटलं आहे.
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवटीविषयी बोलताना चिराग पासवान म्हणाले की, “ज्याप्रकारे उत्तर भारतीयांना टार्गेट केलं जात आहे. कंगनाने प्रश्न विचारले म्हणून ज्याप्रकारे तिचं कार्यालय तोडण्यात आलं. तसंच फक्त व्यंगचित्र फॉरवर्ड केलं म्हणून ज्याप्रकारे माजी नौदल अधिकाऱ्याला मारहाण करण्यात आली, असंच वातावरण कायम राहिलं तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याशिवाय दुसरा पर्याय आहे. लोकांमध्ये सुरक्षेची भावना नसेल, लोकांमध्ये भीतीचं वातावरण असेल आणि सरकारला लोक घाबरतील तर राष्ट्रपती राजवटीशिवाय पर्याय नाही.”