पुणे | भाेर शहरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी भोर शहर पुढील सात दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दरम्यान शहरात केवळ अत्यावश्यक सेवा सुरु असणार आहेत.
भोर शहर रविवार 13 सप्टेंबर ते पुढील शनिवार म्हणजेच 19 सप्टेंबर पर्यंत बंद राहणार आहे. या काळात अत्यावश्यक सेवा सुरु राहणार आहेत. अत्यावश्यक सेवेमधे केवळ वैद्यकीय सेवा वगळता बाकी सर्व सेवा बंद राहणार असल्याची माहिती तहसीलदार अजित पाटील यांनी दिली आहे. तसेच याबाबतचे आदेश आल्यानंतर याबाबत अधिकृत कार्यवाही केली जाईल, असंही अजित पाटील यांनी सांगितलं आहे.
भोर शहरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्यामुळे शुक्रवार 11 सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत 39 ठिकाणी मायक्रो कंटेन्मेंट झोन बनवण्यात आले. मात्र तरीही कोरोनाचा आकडा कमी झाला नसल्याचे आढळून आल्याने सर्व शहर प्रतिबंध करावे, असा अहवाल नगरपालिकेने तहसीलदाराकडे पाठविला आहे.
दरम्यान, वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या पाहता भोरचे आमदार संग्राम थोपटे यांनीही भोर शहर प्रतिबंध क्षेत्र करावे, अशा सूचना प्रशासनाला केल्या होत्या.