आता ड्रग्जप्रकरणी कंगनाचीही चौकशी

मुंबई – अभिनेत्री कंगना राणावतच्या अडचणींत आणखी वाढ होण्याची शक्‍यता आहे. कंगनाच्या ड्रग्ज कनेक्‍शनची चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मुंबई पोलिसांना दिले आहेत.कंगना ड्रग्ज घेत असल्याचा दावा दिग्गज अभिनेता शेखर सुमनचा मुलगा, अभिनेता अध्ययन सुमन याने एका मुलाखतीत केला होता. त्याबाबतची चौकशी मुंबई पोलीस करतील, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

अध्ययन सुमनने चार वर्षांपूर्वी दिलेली एक मुलाखत पुन्हा व्हायरल झाली आहे. त्यात कंगनाने आपल्याला कोकेन घेण्याचा आग्रह केल्याचा दावा अध्ययनने केला आहे. आपण हॅश ट्राय केले होते, पण ते आवडले नव्हते, त्यामुळेच आपण कोकेन घेण्यास नकार दिला होता. कोकेन घेण्यास नकार दिल्यामुळे कंगनाचे आणि माझे कडाक्‍याचे भांडणही झाले होते, असेही अध्ययनने म्हटले होते. 

दरम्यान, शिवसेना आमदार सुनील प्रभू आणि प्रताप सरनाईक यांनी दिलेल्या निवेदनाच्या आधारे कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्र्यांनी दिले आहेत. या प्रकरणाचा तपास आता मुंबई पोलीस करणार आहेत. मात्र कोणता अधिकारी तपास करणार हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाने कंगनाची डोकेदुखी वाढण्याची दाट शक्‍यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!