जळगाव: ‘देवेंद्र फडणवीस यांना बिहार विधानसभा निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. पण त्यांनी महाराष्ट्रात तिकीट वाटपात जसे राजकारण केले तसे बिहारमध्ये करू नये’, असा टोला भाजपचे माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांना लगावला
भुसावळ येथील भाजप कार्यकर्ते प्रा. डॉ. सुनील नेवे यांनी एकनाथ खडसे यांच्या राजकीय जीवनावर लिहिलेल्या ‘जनसेवेचा मानबिंदू : एकनाथराव खडसे’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज दुपारी मुक्ताईनगर येथे खडसेंच्या फार्महाऊसवर ऑनलाइन पद्धतीने पार पडला. या सोहळ्यानंतर खडसे पत्रकारांशी बोलत होते. एकनाथ खडसे पुढे म्हणाले की, फडणवीस यांना बिहार विधानसभेच्या निवडणुकीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेतच. बिहारमध्ये नितीश कुमार आणि भाजपात युती आहे. त्यामुळे आमचे सरकार येईल, अशी आशा करतो. पण देवेंद्र फडणवीस यांच्याकडून एकच अपेक्षा करतो, त्यांनी महाराष्ट्रात जे राजकारण खेळले, याचे तिकीट कापायचे, त्याचे तिकीट कापायचे, याला पाडण्यासाठी प्रयत्न करायचे, त्याला पाडण्यासाठी प्रयत्न करायचे, असे तिथे होऊ नये, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी फडणवीस यांना चिमटा काढत आपली नाराजी बोलून दाखवली.