लाखो एकर जंगलाला भीषण आग

वॉशिंग्टन: अमेरिकेच्या उत्तर-पश्चिम पॅसिफिक भागात लागलेली भीषण आग वेगाने वाहत असणाऱ्या वाऱ्यामुळे अधिकच पसरली आहे. या दरम्यान ऑरेगन भागातील शेकडो घरे आगीत भस्मसात झाली. ऑरेगनचे राज्यपाल केट ब्राउन यांनी सांगितले की जंगलाला लागलेल्या आगीमुळे राज्याच्या इतिहासातील सर्वाधिक नुकसान होण्याची भीती आहे. तर, मागील काही दिवसांपासून लागलेल्या आगीमुळे कॅलिफोर्नियाच्या किनारी परिसरातील आकाश केसरी रंगाचे झाले होते. त्यामुळे या भागावर केसरी रंगाची उधळण झाली असल्याचे दृष्य होते.

भगव्या रंगाचे आकाश

आगीची तीव्रता मोठी असल्यामुळे कॅलिफोर्निया, सॅनफ्रॅन्सिस्को आदी भागातील आकाशाचा रंग भगवा झालेला आढळला. त्यामुळे अनेकांनीही चिंता व्यक्त केली. काही ठिकाणी राख, धूरकं असल्यामुळे दृष्यमानतेवर परिणाम झाला होता.

वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आग पसरली

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. जवळपास ८० किमी प्रतितास वेगाने हवा वाहत आहे. त्यामुळे आगीने रौद्र रुप धारण केले आहे. ऑरेगनच्या पश्चिम भागातील काही समुदायांना तात्काळ घरे रिकामी करण्यास सांगितले आहे. सोमवारपासून लागलेल्या आगीमुळे आणखी मोठे नुकसान होण्याचा इशारा ऑरेगनचे राज्यपाल केट ब्राउन यांनी दिला.

आगीत सात जणांचा मृत्यू

ऑरगन, कॅलिफोर्निया आणि वॉशिंग्टनमध्ये सात जणांचा मृत्यू झाला असल्याचे वृत्त आहे. आगामी काही दिवस अतिशय आव्हानात्मक असून सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे केट यांनी सांगितले. शेकडोजणांनी आपले घर गमावले आहे. तर, हजारोजण या आगीमुळे विस्थापित झाले आहेत. त्याशिवाय अनेकांची वाहनेही आगीत जळून खाक झाली आहेत

प्राण्यांचे हाल

जंगलाला लागलेल्या आगीमध्ये शेकडो प्राण्यांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. प्राणी माणसांप्रमाणे सुरक्षित स्थळी आसरा शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. प्रशासन, संस्थांसह सामान्य माणसेदेखील प्राण्यांना पाणी व अन्न पदार्थ देत आहेत. प्राण्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

लाखो एकरवर आग

ऑरेगनमधील जवळपास चार लाख ७० हजार एकर भागावर आगीचे लोण पसरले असल्याची माहिती यंत्रणांनी दिली. काही ठिकाणी परिस्थिती भीषण असून अग्निशमन दलाच्या जवानांना माघार घ्यावी लागली आहे. आगीमुळे अनेकांना आपल्या हक्काचे घर सोडून इतरत्र सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी हेलिकॉप्टरचीही मदत घेण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!