मुंबई, 08 सप्टेंबर :विधान परिषद उपसभापतीपदाची निवडणूक होऊ नये यासाठी भाजप मुंबई हायकोर्टात दाद मागणार आहे. याबद्दल भाजपच्या गोटात हालचाल सुरू आहे. खुद्द विधान परिषद विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनीच ही माहिती दिली आहे.
विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची आज निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून नीलम गोऱ्हे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर दुसरीकडे भाजपनेही आपला उमेदवार उतरवला आहे. पण, आता भाजपने ही निवडणूक होऊच नये, यासाठी कोर्टात धाव घेण्याची तयारी केली आहे.
कोरोना संकट काळात दोन दिवसाच्या अधिवेशनात काही आमदार अनुउपस्थिती आहे. त्यात निवडणुकींची घाई का? असा सवाल दरेकर यांनी उपस्थितीत केला आहे. सकाळी 10.30 वाजता विधिमंडळात भाजप नेत्यांची बैठक होणार आहे, यावेळी कोर्टात दाद मागायची की नाही, याबद्दल अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.सोमवारी विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी निवडणूक जाहीर करण्यात आली होती. महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून आमदार नीलम गोऱ्हे यांनी अर्ज भरला आहे. तर भाजपकडून आमदार भाई गिरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण, 78 सदस्यीय विधान परिषदेत 18 जागा सध्या रिक्त आहेत. उर्वरित 60 पैकी 23 सदस्य भाजपचे आहेत तर सत्ताधारी महाविकास आघाडीकडे शिवसेना 15, राष्ट्रवादी 9, काँग्रेस 8, लोकभारती 1 असे 33 आमदारांचे संख्याबळ आहे. महाविकास आघाडीकडे जास्त संख्याबळ असल्यामुळे नीलम गोऱ्हे यांची निवड होण्याचे चिन्ह आहे.
काय आहे विधानपरिषदेतील संख्याबळ?
एकूण संख्या – 78
राष्ट्रवादी – 9
काँग्रेस – 8
शिवसेना – 14
भाजप – 22
लोकभारती – 1
पीझंट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया – 1
राष्ट्रीय समाज पक्ष – 1
अपक्ष – 4
रिक्त – 18