शरद पवार आणि अनिल देशमुख यांना पण उद्धव ठाकरे सारखाच धमकीचा फोन…

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मातोश्री निवासस्थान उडवून देण्याची धमकी देणारा कॉल आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा व महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार आणि राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरीही आज एका व्यक्तीने फोन करून धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, याबाबत पोलिसांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

शरद पवार महाराष्ट्रातील प्रमुख व्यक्तींच्या घरी धमक्यांचे फोन खणखणू लागल्याने चिंता वाढू लागली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्या घरीही असेच फोन कॉल आज आले.


मातोश्री निवासस्थानी निनावी फोन आला होता. तसाच फोन कॉल आज शरद पवार आणि अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी आला. दोन्ही ठिकाणी विदेशातून अज्ञात व्यक्तीने कॉल केले होते. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर तातडीने तपास सुरू करण्यात आला आहे.

रविवारी एका व्यक्तीने सकाळी ११च्या सुमारास मातोश्री निवासस्थानी फोन करून धमकी दिली होती. दाऊद गँगकडून बोलत असल्याचा या व्यक्तीचा दावा होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देतानाच मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याचा इशाराही या व्यक्तीने दिला होता. आपल्याला मुख्यमंत्र्यांशी बोलायचे असल्याचेही ही व्यक्ती म्हणाल्याचे सांगितले जात आहे. या फोनमुळे एकच खळबळ उडाली होती. पोलिसांनी तातडीने तपास सुरू करत मातोश्री निवासस्थानाच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली होती. या प्रकारावर राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत गंभीर चर्चाही झाली तसेच संपूर्ण मंत्रिमंडळाने अशी धमकी देणाऱ्या प्रवृत्तीचा निषेध केला. याच बैठकीत या प्रकरणी गुन्हे शाखेमार्फत तपास सुरू करण्यात आल्याचे गृहमंत्री देशमुख यांनी नमूद केले होते. या कॉलनंतर आज देशमुख आणि शरद पवार यांच्या निवासस्थानीही धमकीचे फोन खणखणल्याने चिंता आणखी वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!