गोंदिया : राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांनी अभिनेत्री कंगना रनौतच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे. अभिनेत्री कंगना बाईला आपण इतकं सिरीयसली का घेतोय? बाहेरुन येऊन तिने मुंबईला आपले निवासस्थान केले. तरी त्यांना समाधान नाही. इथे येऊन उलट-सुलट बोलते. मला वाटते, कंगना बाई शुद्धीत नाही,” असे वक्तव्य प्रफुल्ल पटेल यांनी केले.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही अभिनेत्री कंगनाला धमकावल्याचा आरोप कंगनाने केला होता. यानंतर सर्वत्र ट्विटर वॉर सुरु झाले होते. यानंतर शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगनाच्या कानशिलात लावण्यासंबंधी ट्विट केले होते. तसेच राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही, असे विधान केले होते. त्याशिवाय अनेक नेत्यांनी याबाबत विविध प्रतिक्रिया देत कंगनाच्या वक्तव्याचा निषेध केला होता.
काय म्हणाली कंगना पहा …
“शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला उघड धमकी दिली आणि मुंबईत पुन्हा पाऊल ठेवू नकोस असा इशारा दिला. याआधी मुंबईच्या रस्त्यांवर ‘आझादी’च्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?” असा प्रश्न कंगनाने ट्विटरवरुन विचारला होता. यावर संजय राऊत यांनीही ट्विटरवर खेळण्यापेक्षा पोलिसांकडे पुरावे द्यावेत, असा टोला कंगनाला लगावला होता.
ट्विटरवर आपली बदनामी करणारे ट्वीट ‘लाईक’ करण्यावरुन कंगनाचे काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांशी वाजले होते. “सुशांतच्या मारेकऱ्यांविरुद्ध लढा देणाऱ्या लोकांची निंदा करणारे ट्वीट लाईक केले जात आहेत. छेडछाड आणि दमदाटीचा निषेध करण्याऐवजी मुंबई पोलीस आयुक्त त्यांना प्रोत्साहन देत आहेत. लज्जास्पद!!” असे ट्वीट कंगनाने स्क्रीनशॉटसह केले होते.
“बॉलिवूड माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. त्यामुळे हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी” असंही कंगना म्हणाली होती. आधी मुंबई पोलीस आणि नंतर मुंबईविषयी वक्तव्य केल्याने सर्वसामान्य नागरिकांनी कंगनाचा समाचार घेतला होताच. पण शिवसेना खासदार संजय राऊत, भाजप नेते निलेश राणे, काँग्रेस मंत्री नितीन राऊत अशी सर्वपक्षीय टीकाही तिच्यावर झाली.