जिल्हा बँकेत लाखोंचा दरोडा …

जालना : जालना जिल्हा बँकेच्या पानेवाडी शाखेतून सव्वासात लाखांच्या रोकडसह चोरट्यांनी तिजोरी लंपास केली आहे. शेतकऱ्यांच्या पीएम किसान अनुदान वाटपापूर्वीच चोरट्यांनी डल्ला मारला. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डिव्हीआरही पळविला आहे.

जालना जिल्हा बँकेच्या पानेवाडी शाखेतून लाखोंची रोकड आणि तिजोरीही चोरट्यांनी पळवली. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डिव्हीआरही पळवला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील पानेवाडी गावातील जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेचे चॅनल गेट आणि दरवाजाचे कुलूप तोडून चोरी झाल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी उघडकीस आला होता. चोरट्यांनी थेट बँकेची लोखंडी तिजोरी आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डिव्हीआर गायब केला. या तिजोरीत रोख ७ लाख २८ हजार १६८ रुपये होते. रोख रक्कम, १२ हजारांची लोखंडी तिजोरी आणि १० हजारांचा डिव्हीआर असा एकूण ७ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. पीएम किसान सन्मान योजनेचे अनुदान शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी आले होते, मात्र तत्पूर्वीच चोरट्यांनी डल्ला मारला आहे, त्यामुळे खळबळ उडाली आहे. बँकेचे शाखा व्यवस्थापक रघुनाथ जाधव यांच्या फिर्यादीवरून घनसावंगी पोलिसांनी शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!