ठाकरे सरकारच्या आरे च्या निर्णयानंतर जितेंद्र आव्हाडांचं विजयी ट्वीट, म्हणाले…

मुंबई: नॅशनल पार्क तथा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची ६०० एकर वनांसाठी राखीव ठेवून येथे वनसंपदेचे संवर्धन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ठाकरे सरकारनं घेतला आहे. या निर्णयानंतर राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ‘संघर्षाचा विजय असो’ असं म्हणत सूचक ट्वीट केलं आहे.

मेट्रो कारशेडसाठी प्रस्तावित असलेली ही जागा हजारो झाडांची कत्तल झाल्यामुळं वादग्रस्त ठरली होती. फडणवीस सरकारच्या काळात या जागेवरमेट्रो कारशेड बांधण्याचा प्रस्ताव होता. त्यास पर्यावरणप्रेमी संघटना व मागील सरकारमध्ये सहभागी असलेल्या शिवसेनेनं विरोध दर्शवला होता. मात्र, भाजपनं शिवसेनेचा विरोध डावलून तिथं कारशेड उभारण्याचा चंग बांधला होता. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर ‘आरे’तील मेट्रो कारशेड प्रकल्प रद्द करण्याची चर्चा सुरू झाली होती. त्यावर काल मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले. एखाद्या महानगराच्या मध्यभागी अशा रीतीने विस्तीर्ण जंगल फुलविण्याचे संपूर्ण जगातील हे पहिलेच उदाहरण ठरणार आहे. राखीव वनाचा निर्णय घेताना आदिवासी समुदाय तसेच इतर संबंधितांचे हक्क अबाधित ठेवावेत, असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले.

राज्य सरकारच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट केलं आहे. ‘मित्रहो… आम्ही दिलेला शब्द जपला… ‘आरे’चे जंगल वाचावं ह्यासाठी माझ्यासह अनेक जणांनी आंदोलने केली. तुरुंगात गेले, पण तत्कालीन सरकार बधले नाही. परंतु आपले सरकार आल्याबरोबर हे वन संरक्षित करण्याचा निर्णय घेतला गेला,’ असं आव्हाड यांनी म्हटलं आहे. सरकारच्या या निर्णयानंतर सर्वांचं अभिनंदन करताना ‘संघर्षाचा विजय असो’ असंही त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!