Unlock 4 : महाराष्ट्रातून आज ई-पास हद्दपार होणार?

मुंबई : महाराष्ट्रात अनलॉक ४ ची नियमावली जाहीर करताना राज्य सरकार ई-पास रद्द करण्याच्या विचारात आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. लॉकडाऊन लागू केल्यापासून सध्या राज्यात प्रवासासाठी ई-पास अनिवार्य आहे. या ई-पास प्रणालीवर गेल्या काही दिवसांपासून मोठी टीका होत आहे. तर ई-पास चालू ठेवणं म्हणजे केंद्र सरकारच्या नियमावलीचं उल्लंघन असेल, असंही केंद्र सरकारने बजावलं आहे.

केंद्राने नुकतंच आंतरजिल्हा आणि आंतरराज्य प्रवासासाठी कोणत्याही वेगळ्या परवानगीची गरज नसल्याचं सांगितलं होतं. पण याअगोदरच ई-पास इतिहासजमा करणारं कर्नाटक पहिलं राज्य ठरलं होतं. केंद्र सरकारने यापूर्वीच नियमावली जाहीर करत ई-पास प्रणाली बंद करण्याचे निर्देश राज्यांना दिले आहेत. शिवाय कंटेन्मेंट झोन वगळता स्थानिक स्तरावर कुठेही वेगळे निर्बंध जारी करणं म्हणजे केंद्र सरकारच्या नियमांचं उल्लंघन असेल, असंही सांगितलं आहे.

सोमवारी ई-पासबाबतचे नियम जाहीर करत आहोत. केंद्र सरकारने राज्यांना मेट्रो सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यास सांगितलं आहे, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. दरम्यान, मुंबईत मेट्रो आणि मोनो रेल सुरू करण्याबाबत अजून कोणतीही चर्चा नसल्याचं या अधिकाऱ्याने सांगितलं. यावर राज्य सरकारच अंतिम निर्णय घेणार असल्याचं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त आरए राजीव यांनी सांगितलं. सेवा सुरू करण्यासाठी आतुरतेने वाट पाहत आहोत, असं ट्वीट काही दिवसांपूर्वीच मुंबई मेट्रोने केलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!