सिवनी, 30 ऑगस्ट : मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अनेकांनी तर हे भ्रष्टाचाराचं उत्तर उदाहरण असल्याची टीका केली आहे. कोटींमध्ये रुपये खर्च करुन तयार केलेला पूल उद्घाटनापूर्वीच नदीत वाहून गेला. मध्य प्रदेशात मुसळधार पावसामध्ये सिवनी जिल्ह्यातील सुनवारा गावात वैनगंगा नदीवरील कोटी रुपये खर्च करुन तयार केलेला पूल पाण्यात वाहून गेला. साधारण 1 महिन्यांपूर्वी हा पूल सुरू झाला होता, अद्याप याचे अधिकृत उद्घाटनही झालेले नाही.
लोकांनी उद्घाटनापूर्वीच पुलाचा वापर सुरू केला होता. तुटलेल्या पुलाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये नदीतील पाण्याचा स्तर वाढल्यामुळे पुल तुटल्याचे दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हा पूल 3 कोटी 7 लाख रुपयांमध्ये तयार केला होता. पुलाच्या बांधणीचं काम 1 सप्टेंबर 2018 रोजी सुरू झालं होतं. पुलाचे बांधकाम पूर्ण होण्याची तारीख 30 ऑगस्ट ठरविण्यात आली होती. मात्र पूल यापूर्वीच तयार झाला होता, आणि गावकरी या पुलाचा वापर करीत होते. उद्घाटन घेण्यापूर्वीच या पुलाने जलसमाधी घेतली. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. पुलाचा काही भाग कोसळल्यानंतर कलेक्टर राहुल हरिदान म्हणाले, या प्रकरणात तपास सुरू करण्यात आला असून दोषींविरोधात कारवाई केली जाईल.