काँग्रेसच्या बैठकीत आम्हाला पक्षद्रोही ठरवले गेले

नवी दिल्ली: काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना पत्र लिहिल्यानंतर आपल्याला ऐकून घ्यावे लागले ही बाब पत्र लिहिणाऱ्या दिग्गज २३ नेत्यांच्या मनाला लागली आहे. ही गोष्ट हे नेते काही केल्या विसरू शकत नाहीत, असे स्पष्ट होत आहे. याच नेत्यांपैकी एक असलेले दिग्गज नेते कपिल सिब्बल (kapil sibbal) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत आमच्यावर हल्ले होत असताना उपस्थित एकाही सदस्याने आमच्या बचावासाठी एक शब्द देखील उच्चारला नाही, असे सिब्बल म्हणाले. सिब्बल यांच्यापूर्वी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलामनबी आझाद यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती.

कपिल सिब्बल यांनीही केली होती स्वाक्षरी

कपिल सिब्बल यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ या इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत ही नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस पक्ष नेहमीच भारतीय जनता पक्षावर राज्यघटनेचे पालन न करणे आणि लोकशाहीचा पाया नष्ट करण्याचे आरोप करत आला आहे. आम्हाला काय हवे आहे?… आम्ही (पक्षाच्या) घटनेचे पालन करू इच्छितो. त्यावर कोण आक्षेप घेऊ शकेल, असे सिब्बल म्हणाले.

हे वाचा : जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी: शाळांसाठी काय आहेत केंद्राच्या सूचना?

पत्राबाबत सर्वांनाच सांगायला हवे: सिब्बल

काँग्रेसच्या नेत्यांनी सोनिया गांधी यांना लिहिलेल्या पत्रात काय मजकूर आहे, याबाबत काँग्रेस कार्यकारी समितीला कल्पना दिली गेली पाहिजे होती, असे सिब्बल म्हणाले. ही मूलभूत गोष्ट आहे आणि ती व्हायला हवी होती. हे पत्र २३ लोकांनी लिहिले आहे. आम्ही लिहिलेल्या मजकुरात काही चुकीचे असेल तर त्याबाबत आमची नक्कीच चौकशी होऊ शकते, असेही सिब्बल म्हणाले. काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीत या पत्रावर चर्चा करण्यात आली नाही. बैठकीदरम्यान आम्हाला देशद्रोही म्हटले गेले आणि नेतृत्वासह त्या बैठकीला हजर असलेल्या एकाही सदस्याने एक शब्द काढला नाही. आमच्या पत्राचा मजकूर अतिशय सुसंस्कृत भाषेत आहे, असेही सिब्बल पुढे म्हणाले.

काँग्रेस कार्यकारी समितीच्या बैठकीनंतर पक्षाचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (rahul gandhi) यांनी गुलामनबी आझाद (gulamnbi azad) यांना फोन करून त्यांनी उपस्थित केलेल्या चिंता दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!